पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माणिकताईंना त्या बऱ्या झाल्यावर मी एक प्रश्न विचारला की, एवढी मोठी पाच ऑपरेशन्स होताना त्यांना भीतीच्या समंधाने पछाडले कसे नाही? सामान्य माणूस तर मानसिक दृष्ट्या खचूनच कदाचित मृत्युमुखी पडला असता. पण सौ. माणिकताईंनी दिलेले उत्तर म्हणजे श्रद्धेची अंतिम स्थितीच म्हणावी लागेल. त्या मला म्हणाल्या, "मनुष्याला मृत्यू कधीच चुकत नाही. माझी रामावर आत्यंतिक श्रद्धा आहे. दरखेपेस मी स्मरण करताच, तो अंतःचक्षूंसमोर प्रकट होऊन मला धीर द्यावयाचा. त्यामुळे मला भीती कधीच वाटली नाही. उलट मी निश्चित रामकृपेने बरी होणार आहे हा माझा दृढ विश्वास आहे व होता. " विष्णू, शिव, ब्रह्मा, राम, कृष्ण ही सर्व एका अर्थी प्रतीके आहेत. योगसूत्रांतील ध्यानासाठी जी धारणा लागते, तसेच हे धारणेचे रूप असे म्हटले तरी चालू शकेल. पण हे अशक्य काम सौ. माणिकताई करू शकल्या. त्या काही फारशा शिक्षित नाहीत. पातंजल योग, गीता यांचा त्यांचा अभ्यासही जवळ जवळ काही नाही इतपतच. पण त्यांनी जीवनात गीतेतील सांख्ययोग्य व भक्तियोग यांचा सुरेख संगम केला आहे. सत्यकाम जाबाली निसर्गाकडून शिकून ब्रह्मज्ञानी झाला. सौ. माणिकताईंचा मानसिक विकास जीवनात आलेले प्रत्यक्ष अनुभव व चिंतन यातूनच झाला असावा. मला ह्यांतील काहीच जमत नाही. त्यामुळे त्या दिवशीचे माझे उद्गार असे होते, "माणिकताई, तुम्ही आमच्या गुरुमाऊली आहात."
 दुसरी कहाणी सुमारे चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीची आहे. या बाईंना पोटात एक गाठ झाली. त्या काळात कॅन्सरवर उपचार असे काहीच नव्हते. पण डॉक्टर म्हणाले ही गाठ आपण ऑपरेशन करून काढून टाकू. कर्करोगातून ऑपरेशन करून रोग बरा होण्याचे प्रमाण त्या काळात फारच कमी. तेव्हा हे माहीत असल्यामुळे त्या बाईंनी ऑपरेशनला नकार दिला. त्या म्हणाल्या, "मी देवाची मनोभावे सेवा करत आहे. तेव्हा तो काही मला अंतर देणार नाही." त्यांची पूजाअर्चा, जप हे नेहमीप्रमाणेच चालू राहिले. जपाचे प्रमाण वाढले. आणि आश्चर्य असे की गाठ हळूहळू लहान होऊ लागली व वर्षभरात पूर्ण नाहीशी झाली. त्यांची देवावरील संपूर्ण श्रद्धा हेच त्यांना औषध ठरले.

 तिसरी कहाणी अंदाजे ८०-९० वर्षांपूर्वीची आहे. माझे बालपणीच्या मित्राच्या

२१२