पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करण्यास शिकवले. यात आपला कॅन्सर व त्यावर हल्ला करणाऱ्या स्वसंरक्षण पेशी जोरदारपणे लढाई करत आहेत असे चित्र सतत डोळ्यासमोर आणण्यास सांगितले. हाच महत्त्वाचा व सर्वसमावेशक उपचार. त्या रुग्णाला हे पटले व त्याचे पालन अत्यंत श्रद्धेने करण्यास सुरुवात केली. तो नंतर सांगू लागला, "माझ्या डोळ्यासमोर एक काळाभिन्न खडक आहे व त्यावर शुभ्र हिमपातासारख्या कणांचा सतत मारा चालू आहे."
 काही आठवडे गेले. रुग्ण परत तपासणीसाठी आला आणि डॉक्टर्सही चकित झाले. ती कॅन्सरची गाठ लहान झाली होती व रुग्ण निश्चित सुधारत होता. तज्ज्ञांना प्रश्न पडला की, कोठल्याही शास्त्रात न बसणारी ही केस आहे. परत परत तपासण्यांत सुद्धा तेच निष्कर्ष निघत होते. मग ही कोणती शक्ती की जी वैद्यकशास्त्राच्याही पलीकडे कार्य करू शकते? पण हा निष्कर्ष फार लवकरचा होईल, काही काळ तरी जाऊ दे.
 रुग्ण अत्यंत श्रद्धेने हा मानसोपचार करत राहिला. काही दिवसांनी कॅन्सर व रुग्णाला असणारा संधिवातसुद्धा बरा झाला. पुढे त्या तज्ज्ञांनी सतत सहा वर्षे नियमित तपासण्या केल्यावर हा रुग्ण पूर्ण बरा झाला आहे हे कबूल केले. डॉ. सायमॉन्टन यांनी हा पद्धतीला ब्रॉड बॉडी - माइंड प्रोग्राम असे नाव दिले. याचा अर्थ काया - मन उपचारपद्धती. ह्यामुळे एक सिद्ध झाले की, जे विकार आजचे वैद्यकशास्त्र बरे करू शकत नाही, ते मानसिक शक्तीने बरे होऊ शकतात.
 काही वेळा ज्ञानापेक्षा अज्ञानच मानवाला जास्त सुखाने जगण्यास मदत करते. एका रुग्णाला छातीचा कॅन्सर पाच वर्षे असूनही त्याला ते माहीतच नव्हते. त्यामुळे तो सुखात जगत होता. परंतु तपासणीत त्याला फुफ्फुसाचा कॅन्सर आहे असे आढळले. त्याला हे कळले मात्र, तो रुग्ण जणू कोसळून पडला. एक महिन्यातच खोकल्यात रक्त पडू लागले व तीन महिन्यांत तो मृत्युमुखी पडला.

 ही झाली कॅन्सरची हकीकत. हृदयरोगाचे बाबतही काही वेगळी परिस्थिती दिसत नाही. डॉ. डीन ऑर्निश यांचे 'रिव्हर्सल ऑफ हार्ट डिसीज' हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर, त्यातील ध्यान-धारणा, आहार - आसने, प्राणायाम यावर अनेक तज्ज्ञ भर देऊ लागले. आपल्याकडेही ती लाट आली होती. परंतु या उपचारांनी किती

२१४