पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रुग्ण बरे झाले? त्यांचे शेकडा प्रमाण काय ? याचा अभ्यास झालेला नाही. उलट मला माहीत असलेली माझ्या मित्राचीच कहाणी खेदकारक आहे. सैन्यातील एक अधिकारी, नंतर परिवहन खात्यातही अनेक वर्षे काम करून निवृत्त झालेला असा हा गृहस्थ हृदयविकाराने पीडित होता. डॉ. डीन ऑर्निशच्या पद्धतीनुसार येथे चालू असलेल्या पद्धतीत सामील झालेला. सिद्ध समाधी योगाचे काही वर्गही त्याने पूर्ण केलेले होते. परंतु जेव्हा तो उत्तम बरा झाला आहे असे दिसत होते त्याच वेळी त्याला जोराचा आघात होऊन तो वारला.
 मनुष्य एकूणच अडचणीच्या काळात इतरांच्या सल्ल्याने वाहून जात असतो. अगदी साध्या साध्या आजारात सुद्धा कोणी मित्राने काही औषध सांगितले की ते लगेच घ्यावयाचे, जाहिराती वाचून औषधे घ्यावयाची येथपासून डॉ. सायमॉन्टन यांच्या पद्धतीने कॅन्सर बरा होतो, डॉ. डीन ऑर्निश पद्धतीने हृदयरोग बरा होतो असे कळले की लगेच लोकांचा ओढा तिकडे होतो. नंतर मात्र असे की हुशार लोक त्याचा पुरेपूर फायदा उठवितात. त्या पद्धतीची लगेच केंद्रे निर्माण होतात व लोक तिकडे वेड्यासारखे धावू लागतात. रेकीने रोग बरे होतात म्हटले की लोक लागले धावायला. रेकी पंधरा दिवसांत शिकवतो, त्याची फी इतकी. पण या सर्व पद्धतीत यश किती येते याची शास्त्रीय माहिती लिखित स्वरूपात कोठेच मिळत नाही. सांख्यिकी पद्धतीने पाहणी करून यशापयशाचे प्रमाण किती हे कधीही आपल्याकडे पाहिले जात नाही. परंतु अमेरिकेत असे प्रयत्न होतात, अशा काही व्यक्ती किंवा अभ्यासगट ही पाहणी करून निश्चित निष्कर्ष काढून प्रसिद्ध करत असतात. एक नमुना म्हणून डॉ. लीशान यांनी केलेल्या कॅन्सरच्या केसेसचेच उदाहरण घेऊ.

 डॉ. लीशान यांनी निरनिराळ्या रुग्णांशी चर्चा केल्यावर त्यांना असे आढळून आले की ४०% लोकांना सुधारणेचा थोडा गुण आला, १०% लोकांनी त्यांना काहीच फायदा न झाल्याचे सांगितले व १०% लोकांनी खूप बरे वाटत असल्याचे सांगितले. परंतु एकूण बरे झालेल्यांचे प्रमाण फक्त १०% होते. आणि कॅन्सर बरा होण्याचे आधुनिक औषधोपचारांचेही प्रमाण तेवढेच आहे. मग या पद्धतीत श्रेष्ठ व कनिष्ठ कोण? तसे रुग्णांना 'प्लॅसिबो' देऊनही बरे वाटतेच की. ध्यानधारणेमुळे निश्चित फरक पडतो. पण तो तात्पुरता असतो. आहार ही उपचारपद्धती होऊ

२१५