पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शकते यात वाद नाही. पण रुग्ण जर संशयी असेल, त्याची पचनसंस्थाच जर अशक्त असेल व त्याची जर श्रद्धाच नसेल तर शास्त्र बरोबर असूनही यश मात्र दूरच पळते. याचे कारण म्हणजे ती श्रद्धा निर्भेळ नसते. आधुनिक मानसशास्त्राप्रमाणे ताण (Tension) निवारण्यासाठी मनुष्यापुढे दोन मार्ग असतात. एक त्याविरुद्ध खंबीरपणे उभे राहून त्याला तोंड देणे व यश मिळवणे किंवा त्यापासून दूर पळून जाणे (Fight or Flight). अनेक रुग्ण जेव्हा तथाकथित अध्यात्म केंद्रे, योगाचे वर्ग, डॉक्टर लोकांनी चालवलेली केंद्रे इकडे धाव घेतात तेव्हा तो पलायनवादच असतो. आपले दुःख कोणीकडून तरी कुणीतरी - निवारण करावे एवढीच त्यांची इच्छा असते, श्रद्धा नसते. अत्यंत प्रभावशाली श्रद्धा निर्माण होण्यासाठी दीर्घकाळ तपश्चर्या करावी लागते. आपली दिनचर्या, योगसाधना ही सर्वस्वाने एकरूप होऊन करता आली पाहिजे. नुसती ध्यानधारणा, नुसती योगासने, नुसता उत्तम आहार हे अगदी वरवरचे उपाय आहेत. अमेरिकेतील अशी सर्व केंद्रे म्हणजे 'येन केन प्रकारेण' पैसा मिळवण्याची केंद्रे. मग भले त्या रुग्णांची पिळवणूक व परवड कितीही होवो. आपण असे गृहीत धरतो की बुवाबाजी, अंधश्रद्धा ही फक्त अशिक्षित लोकांत असते. त्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकरांसारख्या व्यक्ती सर्वस्वाने काम करत आहेत. पण अत्यंत सुशिक्षित, किंबहुना उच्चविद्याविभूषित व्यक्ती, समाजाच्या वरच्या स्तरातील लोकही तोच निर्बुद्धपणा करत असतात. ह्या अशिक्षित व सुशिक्षित या दोघांतील समान गोष्टी म्हणजे दोघेही पलायनवादी असतात व सतत काहीतरी आधार शोधत असतात. दोघांनाही अंतिम सत्य काय आहे कळत नाही. दोघांच्याही बाबतीत मनाचे उन्नयन हाच मार्ग आहे. त्याला नुसती आधुनिक मानसशास्त्रीय शिकवण उपयोगी पडणार नाही. यासाठी आपली मानसिक व शारीरिक शक्ती वाढवणे भाग आहे. शरीर व मन संबंध हे एक फार मोठे कोडे आहे. ते सोडवण्याचा अंतिम उपाय म्हणजे अध्यात्म हाच आहे. त्याची आपण चर्चा केली, कारण तोच एकमेव मार्ग असा आहे की जो जीवन व मरण हे दोन्हीही सुखदायी करू शकतो.

२१६