पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्या देशात न्यावयाचा ही या कंपन्यांची पद्धत. औषधांचा भडिमार केल्याने आरोग्य - सेवा सुदृढ होणार नाही. आपला देश गरीब आहे. ग्रामीण भागात होणारे मृत्यूचे प्रमाण हे औषधे न मिळाल्यामुळे होत नसून अस्वच्छ पाणी, घाण परिसर व अपुरा आहार यामुळे होत असतात. देशात होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण ५० टक्के इतके असण्यामागे अपुरा आहार, हगवण व न्युमोनियासारख्या विकारांनी ते होतात. साठ टक्के गरोदर महिला अॅनिमियाने पीडित असतात.
 भारतात अमेरिकेच्या मदतीने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च (I.C.M.R.) या संस्थेने एक प्रकल्प हाती घेतला. यात कुषोपण व शारीरिक वाढ यासंबंधी ग्रामीण भागातील मुलांचा अभ्यास करावयाचा होता. प्रमाणित शरीरवाढ किती असावी यासाठी कमीत-कमी व जास्तीत-जास्त पातळींचा मध्यस्तर हे प्रमाण ठरविले गेले. यालाच 'हार्वर्ड मिडिअन' असे म्हणतात. या प्रकल्पाला 'नारंगवाल अभ्यास' (Narangwall Study) असे नाव दिले. नारंगवाल हे पंजाबमधील एक खेडे. या प्रकल्पाचे असे उद्देश होते -
 (१) औषधोपचार वेळेवर केले तर काय सुपरिणाम होतात?
 (२) औषधोपचार व आहार हे जर व्यवस्थित असतील तर काय निष्कर्ष निघतात ?
 (३) तेथील रहिवाशांच्या जीवनात काहीच ढवळाढवळ करावयाची नाही. त्यांना ना उपचार, ना विशेष आहार द्यावयाचा.

 या तीन गटांत समान दुवा म्हणजे स्वच्छ पाणी पिण्यासाठी पाहिजे म्हणून हातपंप व सर्वांना संडास यांची सोय करण्यात आली. खेडेगावातील नेहमी आढळणारे आजार म्हणजे अतिसार व असे जीवाणुजन्य विकार जे अस्वच्छ पाणी, संडासांचा अभाव व अस्वच्छ परिसर यामुळे होत असतात. कुपोषण हा नंतरचा भाग. अपेक्षा अशी होती की, जेथे औषधोपचारांची उत्तम सोय होती तेथे हे विकार व्हावयास नको होते. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेथे औषधोपचारांची उत्तम सोय होती तेथेच विकार सर्वांत जास्त होते आणि जेथे त्या रहिवाशांच्या जीवनात काहीही ढवळाढवळ करण्यात आली नव्हती तेथे हे विकार नगण्य होते.

२१८