पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तयार झालेली औषधे निश्चितच अपाय न करणारी व गुणी असणारच. मग हा इतिहास व शास्त्र विसरून पाश्चात्य आधुनिक रासायनिक औषधे का वापरावयाची व त्यांचे दुष्परिणाम का सहन करावयाचे? आता पाश्चात्य औषध कंपन्या हीच मूळ औषधे आपल्या संहितांमधून घेऊन त्याचीच आधुनिक औषधे बनवीत आहेत. यांची पेटंटस् घेऊन उद्या तीच आपणाकडे येणार आहेत. आजच, हळद, बासमती तांदूळ, इसबगोल अशा वस्तूंच्या पेटंटबद्दलच्या लढाया चालू आहेत. जर आपण तिकडे लक्ष दिले नाही तर हात चोळत बसण्याची वेळ येईल. हा धोका अनेक विचारवंतांनी आपणास सांगितला आहे.
  (४) कोठलीही वैद्यकीय पद्धत शंभर टक्के परिपूर्ण नाही. नाहीतर बाकीच्या सर्व पद्धती मृत झाल्या असत्या. परंतु आज अमेरिकेसारख्या अत्यंत विकसित देशांतही चिनी, जपानी, युनानी, आयुर्वेद ह्या उपचारपद्धती मान्य झाल्या आहेत व त्यांना लायसेन्स घेऊन वापरता येते. मग आपल्यालाही प्रत्येक पद्धतीत जे गुण आहेत त्यांचा विकास करणे का शक्य असू नये? काही औषधांचा विचारी व श्रेष्ठ असे आधुनिक वैद्यकातील तज्ज्ञ थोडाफार का होईना पण वापर करू लागले आहेत. पण बहुतांशी व्यावसायिक आधुनिक वैद्यकच श्रेष्ठ आणि इतर पद्धतींना पुढे काहीही भविष्यकाळ नाही असे अहंकाराचे उद्गार काढतात. नाव नको पण एका मासिकात यावर खूप वादविवाद झाला होता. तो अगदी सरत्या विसाव्या शतकात.

  (५) आधुनिक विचारवंतांनी प्रत्येक उपचारपद्धतीत काही गुण व काही दोष आहेत हे मान्य केले होते. त्यानुसार त्यांनी एकूण सर्व पद्धतींचा सहभाग असलेली 'होलिस्टिक' (Holistic) पद्धत यथायोग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. काही वर्षांपूर्वी बंगलोरला या पद्धतीचे जागतिक स्तरावरील एक अधिवेशनही भरले होते. परंतु ही परिषद भारतात भरूनही तिचा एकूण व्यवसायावर झालेला सुपरिणाम कोठेही आढळत नाही. मला स्वतःला 'होलिस्टिक' हा शब्द खटकतो. कारण यात आधुनिक वैद्यकाला इतर सर्व पद्धती पूरक (Complementary) आहेत हा मूलभूत विचार आहे. पूरक याचा अर्थ दुय्यम म्हणजे घरात जसा कर्ता पुरुष श्रेष्ठ किंवा जो धन्याची भूमिका पार पाडत असतो तो श्रेष्ठ, इतर दुय्यम म्हणजे सेवक. येथे सुद्धा भले त्या विचारवंतांची इच्छा असो वा नसो, कळत नकळत अहंकारांचा

२२२