पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणाले, "देवमूर्ती ही जर दगडाची वा धातूची बनवलेली असेल तर तो निर्जीव वस्तूच. ती फोडली काय, तोडली काय, आपणाला काय अपाय होणार? किंवा काय पाप होणार? या अशा कल्पना मिथ्या आहेत." स्वामीजी व दिवाणजी ज्या दिवाणखान्यात बसले होते तेथे महाराजांच्या पूर्वजांच्या व खुद्द महाराजांची अशा सुंदर तसबिरी लावलेल्या होत्या. स्वामीजी उठले व त्या तसबिरीवर थुंकले. दिवाण संतापले. ते म्हणाले, "स्वामीजी, हे काय केलेत? महाराजांचा एवढा अपमान?" स्वामीजी हसून म्हणाले, “दिवाणजी, ही तसबीर म्हणजे फक्त एक चित्र. त्यात महाराज कोठे आहेत? मग त्यांचा अपमान कसा होणार? तुमची श्रद्धा, आदर यांचे ही तसबीर म्हणजे प्रतीक आहे. तसेच देव त्या दगडाच्या मूर्तीत कधीच नसतो. पण त्या प्रतीकाविषयी श्रद्धा, आदर जो आपल्या मनात असतो तोच त्या दगडाला देवपण देत असतो." ख्रिश्चन बंधू मूर्तिपूजा करत नाहीत, पण त्यांच्या श्रद्धेचे स्थान म्हणजे क्रॉस. आपले शीख बांधव मूर्तिपूजा मानत नाहीत, परंतु गुरू ग्रंथसाहेब हे त्यांच्या आत्यंतिक श्रद्धेचे स्थान. मुस्लिम बंधू मूर्तिपूजा मानत नाहीत. महंमद घोरीने सोमनाथावर स्वारी केली. अनेक मुस्लिम राजांनी देवळे पाडून तेथे मशिदी बांधल्या हा नुसताच मूर्खपणा नव्हता, तर पैगंबरांनी सांगितलेल्या मूळ धर्मभावनांशी याचे काहीच नाते नव्हते. पण या लोकांना सुद्धा निमजगा म्हणजे भिंत, मशीद म्हणजे फक्त एक इमारत या गोष्टी अत्यंत श्रद्धेची व भक्तीची श्रद्धास्थाने आहेत. असे वाटते की सर्वत्र एकच भावना आढळते ती म्हणजे श्रद्धा. मग भले ते कोणत्याही धर्माचे असोत. दया, करुणा, दुसऱ्यांच्या भावनांचा आदर अशा उच्च भावना म्हणजेच धर्म. अगदी असेच विकारापुरते बोलावयाचे म्हणजे मानसचित्र हे प्रतीक असते.

  ह्या प्रतीकाद्वारा विकारमुक्ती मिळवण्यासाठी काही आचारधर्म पाळणे जरूर असते. मानसपूजेमध्ये जसे पूजेच्या आचाराचे पालन करावे लागते तीच गोष्ट येथे लागू पडते. श्रद्धेमधून निर्माण झालेला आचारधर्म हे एक मोठेच साधन आहे. ह्या आचारधर्मामध्ये फक्त रुग्णाचाच सहभाग असून चालत नाही; घरी भोवतालचे कुटुंबीय, हॉस्पिटलमध्ये नर्स, डॉक्टर किंबहुना संबंधित प्रत्येक व्यक्ती यांचा सहभाग असणे अत्यंत जरूर असते. वैद्यकव्यवसाय हा सेवाधर्म आहे. यात, करुणा, पेशंटला

२२४