पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्या आचरणाने मानसिक आधार, अशा गोष्टीत व्यावसायिकांनी सहभाग देणे आवश्यक असते. पूर्वी असा सहभाग फार मोठ्या प्रमाणात आढळावयाचा. पूर्वी खासगी इस्पितळे फारच थोडी. परंतु सरकारी व ख्रिश्चन मिशनऱ्यांनी चालवलेली इस्पितळे असत. ही मिशनची इस्पितळे म्हणजे अशा सहभागाचा आदर्श नमुना असत. तेथील वॉर्डबॉयपासून आया, नर्सेस, डॉक्टर हे त्या रुग्णाच्या भावनांशी, दुःखाशी एकरूप होत. डॉक्टरांनी मायेने अंगावरून हात फिरविला तरी त्या रुग्णांना बरे वाटत असे. मायेचा स्पर्श, करुणेचे भाषण, दुःखात सहभाग या गोष्टी औषधांचे परिणाम कितीतरी पटीने वाढवतात. आज हा सहभागच नाहीसा झाला आहे. जुन्या काळात काहीही यांत्रिक साधने नव्हती. आज अफाट प्रगती झाली आहे परंतु सहभागाचा अभाव व यांत्रिक व्यवहार यामुळे रुग्णांचा प्रतिसादही कमी कमी होत चालला आहे. पूर्वीचे तांत्रिक / मांत्रिक, गंडे, ताईत अशा गोष्टी मंत्रून देत. श्रद्धा असणारांना त्यांचा उत्तम उपयोग होई. वैज्ञानिक दृष्ट्या ते धातूचे तुकडे किंवा दोरे होते. येथे स्वामी विवेकानंदांच्या कहाणीचा अर्थ लागू पडतो. ही असतात प्रतीके, ज्यांच्यावरील श्रद्धा त्यांना शक्ती देत असतात. मागे म्हटल्याप्रमाणे, मंत्र, तीर्थ, एवढेच काय परंतु उत्कृष्ट औषधेसुद्धा जर तुमची श्रद्धा नसेल तर गुण देणार नाहीत व मनाविरुद्ध घेतलेली औषधे अपायच करतील. ज्या माणसाची कशावरच श्रद्धा नाही, अगदी अभ्यास, ज्ञानोपासना, बलसंवर्धन, जवळच्या व्यक्तींचे प्रेम, अशा गोष्टीवर, मग तो जन्मभर शतमूर्खच राहणार.
  आज ज्याला 'इमेजिंग' म्हटले जाते ते अंतर्मन आपल्या अंतश्चक्षूंसमोरही निर्माण करू शकते. ही प्रतिमा निर्माण केली व त्यावर उपायही मानसिक केले तर विकार विनाविलंब नियंत्रणात येतात व थोड्याशा औषधानेही ते सत्वर दूर होतात. या सर्व आध्यात्मिक मार्गांचा उपयोग किती होतो? यावरही संशोधन झाले आहे. याचा सुप्त उद्देशही तुमची इच्छाशक्ती प्रबल करणे हा असतो. डॉ. लीशानसारख्या संशोधकांनी यावर खूप संशोधन केले आहे. पण त्यांना अपेक्षित निष्कर्ष मिळाले नाहीत. का हे आपण नंतर पाहू, प्रथम मानसचित्र डोळ्यांसमोर आणून त्या विकारावर मनानेच उपचार करावयाचे, हे कसे ते पाहू.

डॉ. मायकेल लर्नर हा एक उत्तम मानसशास्त्रज्ञ. त्याने अशा अनेक केंद्रांना भेट

२२५