पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इंद्र म्हणतो, "अरे जो बसला तो बसला आणि त्याचे भाग्यही बसते. जो उभा राहिला त्याचे भाग्यही उभे राहते, जो झोपी गेला त्याचे भाग्यही झोपी जाते व जो चालत राहतो, त्याचे भाग्यही पुढे जाते." ही एकूणच कहाणी निश्चितपणे रूपक आहे. रूपकाद्वारा काही गंभीर सत्ये सांगावयाची, काही उपदेश करावयाचा ही पद्धत पूर्वीपासून चालत आली आहे. नाहीतर जर वरुण हा एवढा श्रेष्ठ देव होता तर त्याला रोहिताला उचलून नेण्यासाठी हरिश्चंद्राची परवानगी खरंच जरुरी होती का? आणि त्याला वनात जाऊन चुकवणे कसे शक्य होते? याद्वारा जे तत्त्व सांगितले आहे ते महत्त्वाचे आहे. इंद्र म्हणतो, "अरे हा सूर्य, हे तारे, हा चंद्र, हे वृक्ष, ही वनचरे, हे पक्षीगण, ह्या नद्या, हे पर्वत अशी ही अफाट चराचर सृष्टी तुला नित्य नवे ज्ञान देईल. रोज नवा अनुभव येईल. एक वन संपले म्हणून थांबलास तर तुला नवीन ज्ञान मिळणार नाही. तेव्हा एक वन संपले तर दुसरे वन, दुसरे संपले तर तिसरे. एक वन दुसऱ्यासारखे नाही." भर्तृहरीने जे म्हटले आहे ते किती सत्य आहे. त्याचा संदर्भ वेगळा असला तरी ते शब्द येथे लागू पडतात -

"कालोह्यहं निरवधि: विपुला च पृथ्वी."

काळाला मर्यादा नाही आणि पृथ्वी अफाट आहे.” यामुळे इच्छा असेल तर रोज नवे ज्ञान मिळेल. अशी ही ज्ञानगंगा आहे.
 सत्यकाम जाबालीने प्रत्यक्ष म्हटले की, "मला वृक्ष, वल्ली, प्राणी प्रत्येकाने ज्ञान दिले." त्याद्वारे त्याला आत्मज्ञान झाले. इंद्रही एका अर्थाने तेच सांगत होता. आता आपणही जंगलात हिंडतो, प्राणी पाहतो, निसर्गाचे सौंदर्य अनुभवतो. पण आपल्याशी हे वृक्ष, प्राणी बोलत नाहीत. तेथील आदिवासीसुद्धा विश्वास बसल्या- शिवाय मन मोकळे करत नाहीत. यात मानव ह्या पृथ्वीला आपली दासी समजतो, उपभोग्य वस्तू समजतो व त्यामुळे निसर्गाचाच नाश होत आहे. त्याला ही जाणीवही नाही की प्राण्यांनाही भाषा आहे, वृक्षांनाही भाषा आहे, भावभावना आहेत. म्हणजेच त्यांना मन आहे. मन ही फक्त मानवाचीच मक्तेदारी नाही. तेही सर्व विश्व व्यापून राहिले आहे. तुकाराम म्हणतात की " वृक्षवल्ली आम्हा सोयरे धारे". हे जे मन मनुष्य व प्राण्यांमध्ये आहे ते समान आहे.

 अगदी प्राचीन काळापासून आदिवासी लोकांत सुद्धा मानवाला अनंत वैश्विक

२२