पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

  "धृतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचमिंद्रीय निग्रहः ।

             धीर्विद्या सत्यमक्रोध दशक धर्मलक्षणम् ॥”

 धृती (संतोष, समाधान), दम ( नियंत्रण, सहिष्णुता ), अस्तेय ( चोरी न करणे), धीः (शास्त्रांचे तत्त्वज्ञान), विद्या ( यथार्थ अभिज्ञान), सत्य, अक्रोध (न रागावणे - शांती) हे दशक म्हणजेच धर्मलक्षण. हे दशक पूर्णपणे मनाशी निगडीत आहे. ह्या गोष्टी अप्रत्यक्षपणे व्यक्तिगत व सामाजिक आरोग्याशी निगडीत आहेत. यामुळे सामाजिक शांतता, सामंजस्य, एकजूट, समाज यांच्या निर्मितीला मदतच होते. पूर्वी ईश्वरनिष्ठा, त्याच्या अवकृपेची भीती व कृपेमुळे संकटनिवारण होणे याविषयी लोकांची अपार श्रद्धा होती. आज नास्तिकवाद आला. यात तसे वावगे काहीच नाही. काही लोकांना पूर्वी धार्मिक असूनही सतत दुःख, संकटे यांना तोंड द्यावे लागत असेल व काही लोक अखंड पापाचरण करून जर चैनीत राहत असतील तर ईश्वर असलाच तर अन्यायी आहे, किंबहुना तो नाहीच, त्याला अस्तित्व नाही हे म्हणणे अयोग्य ठरत नाही. पण ईश्वर ही एक संकल्पना आहे. आपले अत्यंत उन्नत मन हेच ईश्वर असते. त्याला अफाट शक्तीही लाभू शकते. तेव्हा धर्म, ईश्वर या संकल्पना व्यक्तिगत व सामाजिक शांतता, सुख व स्थैर्य यासाठी आवश्यकच होत्या. पण या संकल्पनांची जागा अशाच संकल्पनांनी घेतलेली नाही हे खरे दुःखाचे कारण आहे. धर्माची भीती नष्ट झाली, सामाजिक जबाबदारी नकोशी झाली, व्यक्तिगत स्वार्थ बोकाळला की सर्व पापांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळते. आजचा भोगवाद यातूनच निर्माण झाला. कायदे करून, शिक्षा करून माणूस सुधारत नाही त्याचे मानस सुधारले तर मग सर्वच सोपे होऊन जाते. तेव्हा धार्मिक आचार हा जरूर आहे. स्वरूप. भले वेगळे असो.
गांधीजींची ईश्वरनिष्ठा :

  मी वर म्हटल्याप्रमाणे गांधीजी खऱ्या अर्थाने युगपुरुष होते. एक आदर्श, सर्वांगीण व्यक्तिमत्त्व होते असे सत्यपणे म्हणता येईल. माझे आदरणीय व अत्यंत जवळचे संबंध असलेले सन्मित्र श्री. श्रीपादराव जोशी हे एक असे गृहस्थ आहेत की जे गांधीजींच्या प्रत्यक्ष सहवासात अनेक वर्षे राहिले होते. त्यांच्यांत पत्रव्यवहारही होत असे. ते खऱ्या अर्थाने गांधीवादी होते व आहेत. ते स्वतः ला गांधीभक्त म्हणवून

२३२