पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेतात. ही अंधभक्ती मात्र कधीच नव्हती. त्यांना न पटणाऱ्या गांधीजींच्या गोष्टी त्यांनी समक्ष गांधीजींना सांगितल्या आहेत व वादही घातले आहेत. म्हणूनच मी त्यांना 'डोळस गांधीवादी' म्हणतो. श्रीपादरावांची अनेक भाषणे पुणे आकाशवाणीच्या दर शुक्रवारी होणाऱ्या 'गांधीवंदना' या कार्यक्रमात झाली आहेत व होत असतात. त्यांतील राजकीय, सामाजिक गोष्टींबद्दलची गांधीजींची मते व वर्तणूक हा आपला आजचा विषय नाही. त्यांची ईश्वरनिष्ठा कशी व काय होती एवढाच आढावा आपण घेणार आहोत. श्रीपादराव जोश्यांच्या चार भाषणांत याचा उत्तम ऊहापोह झाला आहे. ही भाषणे ऑक्टोबर १९९९ मध्ये दि. १, १५, २२ व २९ रोजी झाली होती. नंतर त्यांची पुनर्भेटही दि. ५.१.२००१ रोजी झाली होती. त्यातील ईश्वरनिष्ठेचा भागच निवडून संक्षिप्त रूपाने येथे देत आहे.
  "गांधीजींनी धर्म, अर्थ, काम व मोक्ष या स्थूलअंगांचा नव्हे तर त्यांत अंतर्भूत असलेल्या सामाजिक समता, विषमतानिर्मूलन, आरोग्य, रोजगार, दारूबंदी, स्त्रीमुक्ती, साक्षरता, अस्पृश्यता, ब्रह्मचर्य आणि महत्त्वाची सर्वधर्मसमभाव, शरीरश्रम, स्वदेशी, अभय, अपरिग्रह, अस्तेय व त्याचबरोबर मुख्यतः सत्य आणि अहिंसा यांचा खोलात जाऊन विचार केला होता. पण या व अशा अनेक पैलूंचे मूळ कशात होते? ते होते साऱ्या चराचरसृष्टीविषयी त्यांना वाटणारे प्रेम. या सर्व गोष्टींच्या मुळाशी असणारी त्यांची ईश्वरनिष्ठा. 'यंग इंडिया' व 'हरिजन' या आपल्या साप्ताहिकांच्या १३.१०.१९२१, ५.३.१९२५, ११.१०.१९२८, २.६.१९४७ इत्यादी अंकांतून त्यांनी ईश्वरनिष्ठेविषयी खूप मोकळेपणाने लिहिले आहे. हे समजावून घेण्यासारखे आहे. त्यावरून त्यांच्या ईश्वरनिष्ठेची सर्वव्यापकता आणि सर्वांगीणता आपल्या लक्षात येते.

  "गांधीजी सांगतात, "माझ्या सभोवतालची प्रत्येक वस्तू सतत बदलत आहे. नाश पावत आहे (जन्म, जीवन आणि मृत्यू). पण त्या सर्व बदलाच्या बुडाशी एक अविनाशी, सर्वाधार व चैतन्यपूर्ण अशी शक्ती आहे, अशी मला अस्पष्ट जाणीव आहे. ती शक्ती उत्पत्ती करते, लय करते व पुन्हा उत्पत्ती करते. ही प्रेरक शक्ती किंवा तत्त्व म्हणजेच परमेश्वर. केवळ इंद्रियाद्वारा ज्याचे आकलन होते ते शाश्वत नसते, राहत नाही व राहणारही नाही. म्हणून परमेश्वरच काय तो सत्य आहे. ही

२३३