पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शक्ती दयाळू आहे की निर्दय ? मला तर ती केवळ दयामय वाटते. कारण मला असे दिसून येते की विनाशामध्ये जीवन टिकून राहते, असत्यामध्ये सत्य शिल्लक राहते, अंधारामध्ये प्रकाश कायम टिकून राहतो. यावरून मी मानतो की ईश्वर हा चैतन्यमय, सत्यमय, प्रकाशमय आहे. तो प्रेममय आहे, परमकल्याण आहे. " (११-१०-२८). "ईश्वर म्हणजे सत्य व प्रेम, ईश्वर म्हणजे नीतिशास्त्र व नीतिमत्ता. ईश्वर म्हणजे अभय, ज्ञान व चैतन्य यांचे उगमस्थान. तो सर्वांच्या अतीत व श्रेष्ठ आहे. ईश्वर म्हणजे अंतरात्मा." गांधीजींची एक उक्ती प्रसिद्ध आहे. ते म्हणत, "माझा आतला आवाज मला असं सांगतो." हा आतला आवाज म्हणजे परमेश्वराचा आदेश.

 “सारी आशा खुंटली, हातपाय गळाले आहेत, अशा प्रसंगी कोठून ना कोठून मदत येऊन पोहोचते असे मी अनुभवले आहे. ईश्वराची स्तुती, प्रार्थना, उपासनाकाही वेडगळ समजूत नाही. अशी उपासना, अशी प्रार्थना हा काही वाणीचा विलास नाही. त्याचे मूळ कंठात नव्हे तर हृदयात आहे. म्हणून आपण आपले हृदय निर्मळ ठेवले व त्याच्या तारा सुसंवादी राखल्या, तर त्यातून जे सूर निघतील ते गगनाला जाऊन मिळतील. त्यासाठी जिभेची जरुरी नाही. प्रार्थना ही स्वभावतः अद्भुत वस्तू आहे. विकारांच्या शुद्धीसाठी अंतःकरणपूर्वक केलेली प्रार्थना ही दिव्य औषधी आहे, याविषयी मला शंकाच नाही. पण या कृपाप्रसादासाठी आपल्यामध्ये संपूर्ण नम्रता असली पाहिजे " (My Experiments with Truth पृष्ठ . ५१ ) प्रार्थनेमध्ये किती शक्ती असू शकते हे आपण पाहिले आहेच. तेही अगदी अलीकडल्या काळात. गांधीजींनी अनेक वर्षे आधीच हे लिहून ठेवलेले आहे. मृत्यूबद्दलही त्यांचे विचार चिंतनीय आहेत. ते म्हणतात - "माणूस सर्वात जास्त घाबरत असेल तर तो मृत्यूला. आपल्या स्वतःच्या किंवा आपल्या प्रियजनांच्या मृत्यूच्या नुसत्या कल्पनेनेच त्याच्या जिवाचा थरकाप उडतो. आणि तो स्वतः निराधार असल्याची जाणीव त्याला होते. अशा वेळी त्याला अचानक देव आठवतो. आणि माणूस त्याचा धावा करू लगतो. ईश्वरनिष्ठ माणूस मृत्यूच्या कल्पनेने भयभीत होत नाही. माझी ईश्वरावरील निष्ठा अढळ आहे, असे मी मानतो. मनुष्याच्या आयुष्यात मृत्यू म्हणजे एक बदल आहे. तो केव्हाही येवो तो स्वागतार्हच आहे.” “सगळी धर्मशास्त्रे नष्ट झाली तरी 'ईशावास्यमिदं सर्वं' हा ईशोपनिषदातील मंत्र हिंदुधर्माचे सार

२३४