पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्याप्रमाणे एकजण म्हणतो मूर्तिपूजा म्हणजे भोळसटपणा कारण मूर्तीत देव नसतो, परंतु श्रद्धावान व्यक्तीला मूर्तीतच देव दिसू लागतो. हा विरोधाभास दृष्टी व श्रद्धा यामुळे दिसतो. येथे काही मूलभूत प्रश्न उद्भवतात. अध्यात्म म्हणजे काय ? आध्यात्मिक कोणास म्हणावे? साधू, महंत, त्यांचे आखाडे, काशीचे पंडे, पंढरपूरचे विठ्ठलाचे पुजारी हे आध्यात्मिक असतात का ? आणि सर्वस्वाने मानव्य जपणारे, मानवाची सेवा करणारे बाबा आमटे, त्यांचे दोन्ही पुत्र किंवा आजचे अनेक सेवाभावी लोक ह्यांना आध्यात्मिक म्हणावयाचे? अनेक अत्यंत आधुनिक, अगदी सूटबूटात वावरणारे लोक आध्यात्मिक असतात. अध्यात्म म्हणजे कर्मकांड नव्हे किंवा तो भोळसटपणा किंवा अंधश्रद्धाही नव्हे. अध्यात्म म्हणजे आत्म्याला जाणून घेणे. मी कोण? कोठून आलो? माझ्या जीवनाला काय अर्थ आहे ? जीवनमूल्ये कशाला म्हणता येईल? कारुण्य म्हणजे काय? असे बहुविध प्रश्न व त्यांना मिळणारी उत्तरे हेच अध्यात्म आहे. निरामय जीवनाची तीच गुरुकिल्ली आहे. ही गुरुकिल्ली श्रीपाद- रावांना सापडलेली आहे. तसा उपनिषदे, गीता अशा ग्रंथांचा त्यांचा अभ्यास कधीही वरवर बघणारांना कळणार नाही. म्हणूनच 'पाण्यातील कमलपत्राप्रमाणे' ते निर्लेप जीवन जगू शकतात. त्यांचे अंतरंग आज मी पूर्ण जाणू शकतो. खरा आध्यात्मिक त्यागी असतो. चंगळवाद, सत्तालोभ या आधुनिक काळातील प्रवाहापासून तो दूर असतो. त्यामुळेच तो स्थितप्रज्ञ बनतो. त्याला असह्य ताणतणाव कधीच येत नाहीत. त्यामुळे रोगांचे हल्लेही होत नाहीत किंवा ते निष्फळ ठरतात. अध्यात्म हा जीवनाचा अतूट भाग आहे, ही माझी स्पष्ट धारणा आहे. त्याला अनुसरूनच हा ग्रंथ लिहीत आहे.
  डॉ. व. दि. कुलकर्णी हे मुंबई विश्वविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख होते. एक लेखक व उत्तम परीक्षक म्हणून ते ओळखले जातात. हा लेख म्हणजे नवीन लेखकांना व्यक्तीची ओळख कशी करून द्यावी याचा एक उत्तम नमुना आहे.
मानसप्रतिमा - व्यावहारिक प्रकार :

या विषयातील तज्ज्ञांनी मानसप्रतिमानिर्मितीचे अनेक प्रकार वर्णन केले आहेत. त्यांचा थोडक्यात आढावा घेऊ.

२३६