पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 (१) ग्रहणशील / सहजप्राप्त (Receptive) :
 या प्रतिमा म्हणजे मुद्दाम केलेली निर्मिती नव्हे तर सहज मनात उद्भवणाऱ्या प्रतिमा असतात. या अचानक निर्माण होतात आणि त्यांची निर्मिती अजाणता, जाणीवपूर्वक न केलेल्या अशा असतात. प्रत्यक्ष निद्राधीन होण्यापूर्वी किंवा निद्रेतून बाहेर जागृतीत येत असतात. स्वप्ने आपण निर्माण करत नाही तर ती पडतात. एक स्त्री 'मल्टिपल स्क्लेरॉसिस' (Multiple Sclerosis) या विकाराची रुग्ण होती. हा विकार जवळ जवळ कधीही पूर्ण बरा न होणारा आहे. या स्त्रीच्या मनःचक्षूंसमोर एक हरीण यावयाचे व त्यानंतर लगेच ताणतणाव, आयुष्यातील बदल यांची तिला जाणीव व्हावयाची. हे हरीण म्हणजे जणू धोक्याचीच सूचना. पुष्कळ वेळा काहीही कारण नसताना आपल्या मनात अचानक भीती निर्माण होते, कानांत आवाज होऊ लागतात व काहीतरी अपायकारक घडणार आहे अशी भावना निर्माण होते. किंवा धोक्याची पूर्वसूचना देणारी स्वप्ने पडतात. काही लोकांना दुश्चित्रे दिसतात. याविरुद्ध चांगले भविष्य सांगणारे शुभशकून होतात. ही सर्व उदाहरणे, या अजाणता होणाऱ्या जाणिवा अथवा सहजप्राप्त प्रतिमा याबाबतचे झालेले संशोधन असे सांगते की मानवाला शरीराकडूनही स्वतःविषयी संपूर्ण माहिती याद्वारे मिळू शकते. फक्त आपले मन अत्यंत शांत ठेवून 'ती भाषा' ऐकण्याची सवय करून घ्यावी लागते. यामुळे लहानसहान विकार, दुःखे इत्यादी आरोग्याला हानिकारक गोष्टींची प्रथमावस्थेतच जाण येऊन त्याचे पुढे होणारे गंभीर स्वरूप सहज टाळता येते. हे विचार किंवा प्रतिमा आपल्या भविष्याची गंभीर सूचना देत असतात. स्वप्ने भविष्य सांगतात असे पूर्वजांनी लिहून ठेवले आहे. त्यावर पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. हे थोतांड आहे असे म्हणावयाचे काही कारण नाही. आपण एवढेच म्हणणे युक्त होईल की आपल्या ज्ञानापलीकडील किंवा कल्पनेपलीकडील हे शास्त्र आहे.
 (२) जाणीवपूर्वक केलेली प्रतिमानिर्मिती (Active Imagery) :

 या प्रकारात विचारावर नियंत्रण ठेवून आपल्याला हव्या त्या प्रतिमा निर्माण करून मनःचक्षूंसमोर आणणे ही क्रिया असते. मन नेहमी विचाराद्वारे देहाकडून क्रिया करून घेत असते. याउलट आपण विचारांवर ताबा ठेवून निवडक विचाराद्वारा मनापुढे प्रतिमा ठेवावयाची. समजा, आपली मान दुखत आहे. आपण शरीर सैल

२३७