पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सोडून ह्या दुःखाची संकेतात्मक चिन्हाने कल्पना करून त्याची प्रतिमा डोळ्यांसमोर आणावयाची. मानेतील वेदना ताणलेले रबर, एखादा गोळा या स्वरूपात कल्पावयाच्या किंवा हे दुःख जर मानेतील मणक्यांत दोष निर्माण झाल्यामुळे येत असेल तर ते मणके, त्यांची स्थिती हेच डोळ्यांपुढे आणावयाचे. असाच प्रकार संधिवातामुळे येणाऱ्या वेदना, डोकेदुखी यांचे बाबतही करावयाचे. सवयीने आपल्याला शरीराशी संवाद करता येतो. हा संवाद प्रतीकाद्वारा करावयास अडचण येत नाही. शरीर याला सहज प्रतिसाद देते. काही माणसांना निद्रानाशाचा विकार असतो. समजा, आपण त्यांच्यापैकीच एक आहोत. तर आपण 'वाचेविण' शरीराशी संवाद साधावयाचा. शरीराला सांगितले पाहिजे की "देहा, स्वस्थ हो, सर्व ताण नाहीसे होणार आहेत, झोपी जा - झोपी जा." किंवा आपल्या अत्यंत आनंदाच्या घटनांची आठवण काढावयाची, त्यांतच रममाण व्हावयाचे. हळूहळू जणू आपण हलके झालो आहोत, हवेत तरंगत आहोत असा भास निर्माण करावयाचा, किंवा आपण अत्यंत शांतपणे आपल्या अंथरुणावर पडलो आहोत, आपले डोळे हळूहळू मिटत आहेत, आपण झोपी जात आहोत. ही झाली अप्रत्यक्ष प्रतिमानिर्मिती.
  (३) प्रत्यक्ष वस्तुमानाची व प्रतीकात्मक प्रतिमा (Concrete and Symbolic Image) :

  प्रतिमेसाठी कशाचे चित्र डोळ्यासमोर आणावयाचे हे व्यक्तीव्यक्तीच्या आवडीनुसार ती व्यक्ती ठरवत असते. यात एखादी प्रत्यक्ष वस्तू किंवा प्रत्यक्ष शरीर- संस्थेच्या भागाचे चिंतन केले जाते. यात पेशीपासून अवयवापर्यंत कशाचीही त्याच्या चित्रापासून ते आधुनिक यांत्रिक साधनांनी डोळ्याला दिसणाऱ्या चित्रापर्यंत काहीही गोष्ट चालू शकते. या प्रकारातून मनुष्य बाहेर पडून ईश्वराची मूर्ती, संत-महात्म्यांचे फोटो, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे किंवा महात्मा गांधींसारखे आदर्श पुरुष, ही प्रतीके वापरू लागतात. देहाच्या अवयवांच्या आकृत्या डोळ्यांसमोर येण्यासाठी शरीररचनेचे पूर्ण ज्ञान अवगत असणे जरूर असते. त्यापेक्षा प्रतीकात्मक प्रतिमा डोळ्यासमोर आणणे हे सोपे. या अशा प्रतिमा डोळ्यांसमोर आणून केलेल्या चिंतनाचा किंवा विचारांचा विकारमुक्तीसाठी खूपच फायदा होतो.

२३८