पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विकारमुक्तीची अंतिम स्थिती. हे होत असताना अनेकांना अनेक प्रकारचे अनुभव येत असतात. आपले शरीर खूप गरम झाले असून ते बरे होत आहे, शरीराचा रोगपीडित भाग नव्याने प्रकाशमान होत आहे इत्यादी. आपल्या तत्त्वज्ञानात प्रकाशाला एक वेगळे स्थान आहे. 'तमसो मा ज्योतिर्गमय ।' या प्रार्थनेत ते गृहीत धरले आहे. अंधारातून प्रकाशाकडे, निबिड अरण्याच्या भयावह गर्भातून मोकळ्या आश्वासक प्रदेशात येणे, मंद सुवास, मंद गंभीर ध्वनी येणे या गोष्टी ईश्वरकृपेच्या समजल्या गेल्या आहेत. हाच प्रकार आधुनिक पद्धतीत आहे. यातून क्षणार्धात अगदी कर्करोगापासून मुक्ती मिळाल्याची उदाहरणे आहेत. यांना वैज्ञानिक म्हणता येईल असा आधार नाही पण या गोष्टी अनुभवसिद्ध आहेत.
(७) दैनंदिन आचारातील मानसप्रतिमांचे स्थान :
डॉ. जीन अॅक्टरबर्ग, बार्बारा डॉसी व लेस्ली कोलमायर या त्रयीने ही जी पद्धत शोधून काढली, ती मुख्यत: हॉस्पिटल्स व क्लिनिक्स येथील उपचारांची सुपरिणामता वाढवण्यासाठी. ओघानेच ही पद्धत वैद्यकशास्त्राला पूरक आहे. अर्थातच ती त्या शमान सारख्या पंथीयांच्या सणवार, धार्मिक कृत्ये यांचा पूर्ण अभ्यास करूनच, यात वर दिल्याप्रमाणे हॉस्पिटल्स व क्लिनिक्स यांतील दिनचर्याच फक्त विचारात घेतली गेली आहे. आयुर्वेदीय किंवा निरोगी माणसांच्या दिनचर्येशी याचा स्पष्ट असा काहीही संबंध आहे असे वाटत नाही. यात त्या त्रयीने अंतिम उद्देश व ह्या पद्धतीचा वापर हॉस्पिटल्समध्ये कसा करावा हाच विचार केला आहे. तेथे ही मानसप्रतिमा कशी वापरावयाची याचे विवरण खाली दिल्याप्रमाणे आहे -
 (१) आपल्या शरीरांतर्गत ज्या हालचाली चालू आहेत त्यांचा शोध घेणे व निदान करणे याला आपली संवेदनशीलता वाढवणे.
 (२) शरीराला विकारमुक्तीचे संदेश देणे.
 (३) आपले जुने दृष्टिकोन बदलणे व आपले वर्तन (आरोग्याला सुसंगत) असे बदलणे.
 (४) हॉस्पिटलमध्ये जे उपचार केले जाणार आहेत, त्यासाठी मनाची तयारी करणे.

२४०