पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तसेच कारुण्यपूर्ण आवाजात म्हटलेली गाणी आपल्या डोळ्यांत पाणी आणतात. मला लता मंगेशकर यांच्या आवाजात ह्या कारुण्याचा नेहमीच अनुभव यावयाचा. असाच अनुभव सुमन कल्याणपूर यांच्या भक्तिसंगीतात येतो. असे संगीत निश्चितच पेशंट, त्यांचे चाहते, त्यांच्याकरिता प्रार्थना, जप करणारे लोक यांच्यावर निश्चित होणार हा माझा विश्वास आहे. याचा सुपरिणाम म्हणून रोग्याच्या वेदना कमी होणे, रोगपरिहाराला मदत निश्चितच होते. मनाचे उन्नयन करण्याची शक्ती संगीतात आहे. आणि गेय आवाज नसूनही पूर्वीच्या स्त्रिया साध्या आवाजात त्यामध्ये पूर्ण रत होऊन जेव्हा प्रार्थना म्हणावयाच्या, त्यांचे गायन म्हणून लताच्या पासंगालाही पुरणारे नसले तरी त्यांची आवाजातील करुणा हृदयाला भिडत असे. पूर्वी पिठाच्या गिरण्या नव्हत्या त्या वेळी घरोघर जाती असत. खेडेगावी तर पिठाच्या गिरण्या अनेक वर्षे नव्हत्या. पण पहाटेची वेळ, जात्याची घरघर एकसुरात चालू आहे, दळणारी स्त्री साध्या सुरात ओव्या म्हणत आहे, आपण अर्धवट जागे, अर्धवट निद्रेत आहोत त्या वेळी या ओव्या आपल्याला वेगळ्याच उच्च वातावरणात घेऊन जातात हा माझा अनुभव आहे. या व अशा सर्वच गोष्टी कालौघात लुप्त झाल्या आहेत. याबद्दल खेद करण्याचे फारसे कारण नाही. पण या चांगल्या रीतींची जागा नवीन, तितक्याच प्रभावी गोष्टींनी घेणे ही आपल्या निरामय जीवनाची खरी गरज आहे. अशा अनेक गोष्टींचा वैद्यकशास्त्राला अत्यंत पूरक म्हणून उपयोग होऊ शकेल. अत्यंत अवघड केसेसमध्ये सुद्धा यशाची टक्केवारी वाढू शकते. आजची हॉस्पिटल्स किंवा मोठी क्लिनिक्स येथील एकूण वातावरण मनावर निश्चितपणे दडपण आणणारे असते. त्याचे रूपांतर आश्वासक वातावरणात झाले पाहिजे म्हणजे रुग्ण शांत राहण्यास व लवकर बरे होण्यास मदत होईल. एवढेच की त्या पेशंटची आवड काय आहे, हे पाहून त्याप्रमाणे करावे लागेल. त्याला नाट्यसंगीत, उपशास्त्रीय, शास्त्रीय वा कविता, जे आवडत असेल ते त्याला ऐकवावयाचे. हे फक्त त्याच्या पुरतेच असावे. यासाठी वॉकमनचा उत्तम उपयोग होईल.
स्पर्शोपचार (Touch Healing ) :
हस्तस्पर्शाने विकार बरा करणे ही कल्पना काही नवीन नाही. पूर्वीच्या सर्वांगावर हात फिरवणे, मंत्र म्हणणे, डोक्यावर हात ठेवून आशीर्वादात्मक मंत्र म्हणणे, या

२४३