पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोष्टी निर्मळ मनाने परत तपासून त्यांतील सत्य काय हे शोधण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे. या सर्व पद्धती नीट पाहिल्या तर असे दिसते की डझनावारी अमेरिकन डॉक्टर्स या कार्यात सहभागी होत असतात. पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांनी जीवनाच्या निरनिराळ्या अंगावर केलेले चिंतन, हे विश्व व विश्वातील अणू एवढा असणारा मानव याविषयी चिंतन, अभ्यास, अनुभूती यातून निर्माण केलेले तत्त्वज्ञान हाही या वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांनी पायाभूत विचार गृहीत धरलेला दिसतो. कोठेही असला तरी जसा मानव हा एकच आहे; त्याचा रंग, रूप, धर्म, आचरण ही सर्व वरवरची रूपे आहेत, तसेच अध्यात्माचे आहे. त्याला आधुनिक तज्ज्ञांनी वेगवेगळी नावे दिली तरी अंतर्याम एकच आहे. शेवटी एकमेव अरूप शक्ती हेच फक्त अंतिम सत्य आहे. त्याला तुम्ही आत्मा म्हणा, ब्रह्मांडव्यापी मन म्हणा, ही फक्त वरची रूपे. आपल्याकडे प्राचीन काळी ऋषिमुनी याच निर्गुण निराकार तत्त्वाची स्तुती ऋचांच्या स्वरूपात करत असत. यातूनच संस्कृतीचा विकास होत गेला. ही अरूप शक्ती कशी आहे हे सामान्यांना चटकन कळत नाही, त्याची आकृतिबद्ध प्रतिमा डोळ्यांसमोर येत नाही, म्हणूनच संतांनी त्याला सगुणरूप दिले. काही संतांनी या अव्यक्तालाच विराट पुरुष असेही म्हटले आहे. माझी अशी कल्पना आहे की, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखविलेले विश्वरूप दर्शन फारसे वेगळे नसावे. याच अरूप शक्तीचे अनेकानेक पैलूंचे दाखविलेले दर्शन ते हेच असावे. या अस्तित्वाची जाणीव आपल्याला विनम्र करते, आस्तिक बनवते. यातूनच मानव्याची आर्तता आपण जाणू शकू. या अरूपाचे स्तवन, पूजन म्हणजे कर्मकांड नव्हे. त्याच्याशी मनाने एकरूप होणेसाठी ही साधने आहेत. हीच मनाला शक्ती देतात, मानव्य शिकवतात, सेवाभाव शिकवतात. आपल्या विषयाशी निगडीत याचे स्वरूप म्हणजे सेवाभाव उन्नत मन हे शिकवते. मानवाची सेवा हीच ईश्वरसेवा हे शिकवते. या सेवेला फलही कृपेचेच मिळते.

 प्रत्यक्ष व्यवहारात वैद्यकशास्त्राचे काय दर्शन होते हे निःपक्षपातीपणाने पाहणे बोधक ठरेल. वैद्यकशास्त्राकडे बुद्धिवंत विद्यार्थी का वळतात, ढिगावारी अर्जातून काही विद्यार्थीच का निवडले जातात, हे आपले सामान्य प्रश्न. (यालाही काळी बाजू आहेच. पण कोळसा कशाला उगाळा?) यात काही तत्त्वाने, काही आदर्श

२४५