पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डोळ्यांसमोर ठेवून त्यासाठी ज्ञानप्राप्तीची कास धरलेले ध्येयवादी विद्यार्थी आहेतच. परंतु सर्वसाधारणपणे यात अफाट पैसा मिळतो या ओढीने येणारे विद्यार्थीच बहुसंख्य असतात. त्यातही ज्याची पदवी जास्त उच्च, ज्याच्या नावापुढे दहा-बारा पदव्यांची माळ आहे, तो सर्वोकृष्ट डॉक्टर. याची सेवेची किंमतही तशीच उच्च. पण सर्वांनाच असे यश मिळते असे नाही. मग केवळ स्वार्थाकरिता व आधुनिक भोगवादाचा आदर्श समोर ठेवून धडपडणाऱ्या आधुनिक व्यावसायिकांना काय म्हणावे ? व्यवसायात यश मिळवणे याचे मूल्यमापन त्याने पैसे किती मिळवले यापेक्षा या व्यवसायाचा पाया म्हणजे सेवाधर्म हा किती पाळला जातो ही पट्टी लावली जावी.

 दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे शास्त्र जितके सुधारते आहे तितकेच ते एकांगी होत चालले आहे. प्रत्येक रोगाचा तज्ज्ञ वेगळा, तपासण्या वेगळ्या. परंतु शरीर म्हणजे निरनिराळ्या तुकड्या-तुकड्यांचे बनलेले यंत्र नव्हे. प्रत्येक अवयवाची कार्यक्षेत्रे वेगळी असली तर सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे काम करत असतात. एकूण सोयीसाठी त्यांची कार्यक्षेत्रे वाटून घेतलेली असतात. कुटुंबाच्या एकरूपतेत प्रत्येक घटक सर्वांशीच संपर्क साधून असतो, सल्लामसलत करतो, तशीच बुद्धी प्रत्येक • अवयवाला आहे. ते एकमेकांशी सतत संपर्क साधून असतात, संवाद करत असतात. यावर असे म्हटले जाते की हे तत्त्वज्ञान काही नवीन नाही, आम्हाला माहीत आहे. म्हणजे तत्त्व वैचारिक स्तरावर मान्य परंतु व्यवहारात येत नाही व आणावयाची प्रामाणिक इच्छाच नाही. ध्येय फक्त एक पैसा मिळवणे. नवरा मरो, नवरी मरो, भटजीला दक्षिणा मिळाल्याशी संबंध. संपूर्ण शरीराचा एकत्रित विचार हा अत्यंत महत्त्वाचा विचार कायम बासनातच ठेवला जातो.

 हे झाले एक अंग. परंतु अत्यंत आधुनिक व ज्याला आपण वैद्यकशास्त्राचाच एक भाग मानतो, ते मानसोपचारशास्त्र होय. एकूण मानसशास्त्राचाच हा एक भाग, परंतु तो रुग्णतेशी निगडीत आहे. म्हणून त्याला मानसोपचार पद्धत म्हणावयाचे शारीरिक उपचार व मानसोपचार हे तरी हातात हात घालून आजार दूर करण्याच्या सेवाकार्यात सहभागी होतात का? मानसोपचारतज्ज्ञांची गोष्टच निराळी. त्यांची सल्लाकेंद्रे वेगळी. तेथे जे रुग्ण सल्ल्यासाठी जातील त्यांच्यावरच ते उपचार करणार. त्यांना प्रत्यक्ष हॉस्पिटलच्या कार्यात काहीही स्थान नाही. अनेक

२४६