पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपचारात काहीही स्थान नाही. शिवाय या शास्त्राच्या सुद्धा मर्यादा आहेत. मानसचित्र पद्धत हीही मानसोपचाराचा एक भाग समजण्यास काहीच हरकत नसावी किंबहुना ध्यानधारणा, जप, प्रार्थना या गोष्टी सामान्य स्तरावर मनावर उपचार करत असतात. म्हणून एका दृष्टीने त्यांनाही मानसोपचार म्हणता येईल. डॉ. कोल्हटकर यांनी पातंजल योगसूत्रांना 'भारतीय मानसशास्त्र' असे म्हटलेले आहेच. इ.स. पूर्वी ३०० ते ४०० वर्षांपूर्वी लिहिलेला हा ग्रंथ आजही प्रमाणभूत मानला जातो. उपनिषदांचा काल तर हजारो वर्षांपूर्वीचा, पण त्या वेळी सुद्धा ऋषिमुनींनी मनाचा शक्यतो खोलवर विचार केलेला होताच. आजचे मानसशास्त्र विज्ञानाधिष्ठित आहे, परंतु ते परिपूर्ण आहे असे म्हणता येणार नाही, त्यालाही अगम्य, दुरुस्त न होणाऱ्या विकारांवर उपाय सापडलेला नाही. तेव्हा आजचा आपला अंतिम उद्देश म्हणजे विकारापासून मुक्ती, आरोग्यप्राप्ती व निरामय जीवन आहे. शेवटी मृत्यू हा अटळ आहे पण तो योग्य काळी परमेश्वराने दिलेल्या नैसर्गिक कालखंडानंतर. अकाली मरण हे केव्हाही येऊ न देण्याची गोष्ट. मरणसुद्धा शांतपणे व निर्भय वृत्तीने यावे. आपल्याकडे जीवन कसे असावे त्याचा एक श्लोक प्रसिद्ध आहे.

"विना दैन्येन जीवनम् । विना दुःखेन मरणं ॥ "

 गंभीर आजारी रुग्णांना सुद्धा जे काही त्यांचे आयुष्य आहे, ते हाल न होता मृत्यू शांतपणे यावा. ख्रिश्चन धर्मीयांत या समयी पाद्री येऊन त्याच्यासाठी पार्थना करण्याची प्रथा आहे. आपलेकडे सुद्धा तो समय नजीक आल्यावर गीता, ज्ञानेश्वरी वगैरे ग्रंथांचे वाचन केले जातेच की. पूर्वी मरणोन्मुख व्यक्तींच्या हातात गाईची शेपटी देण्याची काही ठिकाणी प्रथा होती. असे म्हटले जायचे की यामुळे त्या व्यक्तीचा आत्मा स्वर्गाला जातो. तोंडात गंगाजल घालणे हे तर सर्रास चालू होतेच. त्यासाठी घरोघर पूजेत गंगाजलाचे भांडे सील करून ठेवलेले असे. अर्थात बुद्धिवादात याला काहीही जागा नसली तरी त्या लोकांच्या भावना मात्र उच्च असत.

 मनुष्याचे जीवन निरोगी करण्यासाठी निरनिराळ्या वैद्यक पद्धती, मानसोपचार पद्धती यांच्या बरोबरच त्याला अध्यात्माची जोड दिली तर ती वैद्यकशास्त्राला उत्कृष्ट पूरक ठरू शकेल. वैद्यकशास्त्राची मदत ही टाळता येणार नाही. आजचे

२४८