पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाबाली माहीत असणे अशक्यच मानावे लागेल. शमानिझमची अभ्यासू मर्सिया इलियाड ही म्हणते -
 "एकूणच अत्यंत पुरातन काळातील जंगल निवासी माणूस / आदिवासी व प्राणी यांच्यातील संबंध आध्यात्मिक अथवा आधिदैविक स्तरावरचे होते. त्यामुळे आजच्या नास्तिकवादी लोकांना हे कळणे कठीण आहे. हे जंगलनिवासी लोक ज्या प्राण्याचे कातडे पांघरत, तो प्राणी आपणच झाल्याची त्यांची श्रद्धा असे. आजही असे लोक आहेत की जे प्राण्यांचे रूप घेऊ शकतात असे म्हटले जाते. असे हे रूप धारण करणे म्हणजेच मानव रूपांतर करून प्राणी बनणे म्हणजे आपल्या देहातून दुसऱ्याच्या देहात प्रवेश करणे होते."
 भारतातही परकायाप्रवेशाची संकल्पना आपणाला अनेक कथा - पुराणांत आढळते. पुढला जन्म निरनिराळ्या प्राण्यांत येतो. असे ऐंशी दशलक्ष जन्म घेतल्यावर मनुष्याला मुक्ती मिळते. गौतम बुद्धांनी डुकराचा जन्म घेतला होता व त्यांना त्यातून मुक्त करण्यासाठी गेलेल्या त्यांच्या शिष्यांना ते म्हणाले, "मी सुखी आहे, हा जन्म मला उपभोगू द्या." राजा दिलीपाची परीक्षा घेण्यासाठी सिंहाचे रूप घेऊन भगवान आले व त्याला ज्या कामधेनूचे रक्षण करावयाचे होते, तिच्यावरच त्याने हल्ला केला. तिला सोडवण्यासाठी दिलीप त्या सिंहाशी बोलला. कहाणी दीर्घ आहे परंतु राजा दिलीप सिंहाशी बोलू शकत होता, त्यांचा संवाद घडला होता. हे सर्व सोडून दिले तरी प्राण्यांना प्राणी म्हणून तुच्छ न लेखता त्यांना सन्मानाचे स्थान देणे हा तर प्रत्येक संस्कृतीचा भाग होता. गाईला आपण गोमाता म्हणावयाचो. बैलाला पोळ्याचे दिवशी विश्रांती देऊन, त्याला पक्वान्ने भरवावयाची व त्याच्याविषयी कृतज्ञता दर्शवावयाची, नागपंचमीला नागाची पूजा करावयाची, अशा अनेक परंपरा आपल्याकडे का निर्माण झाल्या?

 या सर्व कहाण्या खऱ्या का खोट्या हे ठरवावयाचा आपणाला आज तरी अधिकार नाही. ज्या विज्ञानातून फक्त आधिभौतिक प्रगती झाली व होत आहे असे म्हटले जाते व ज्याची अपरंपार किंमत आपण वेगवेगळ्या रूपाने मोजतो आहोत, त्या मार्गाने आध्यात्मिक ज्ञान होणे अशक्य आहे. परंतु ही जुनी संस्कृती - भले ती भारतीय असो, इजिप्शिअन असो वा इतर, त्यांच्या विषयी आदर ठेवणे, व जर

२४