पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रयोगांद्वारे जी सत्ये शोधून काढली त्यांचा पायाही हाच आहे. पाश्चात्य संशोधन व निष्कर्ष यांचा आढावा आपण नंतर घेऊच. भारतीय प्राचीन ग्रंथांपैकी आरोग्याशी निगडीत ग्रंथांमध्ये आयुर्वेदाच्या निरनिराळ्या संहिता या वैद्यकशास्त्राशी निगडीत आहेत. त्यांत देह व मन यांच्या विकारांशी निगडीत चर्चा व सूचना आहेत. परंतु केवळ मनाशी निगडीत व कैवल्यप्राप्ती हे ध्येय मनात ठेवून लिहिलेला ग्रंथ म्हणजे 'पातंजल योगसूत्रे'.
 पतंजली स्वतः आयुर्वेदतज्ज्ञ होते. तेव्हा देहाचे आरोग्य हे त्यांचे डोळ्यांसमोर होतेच. परंतु त्यांतील योगसूत्रे मुख्यतः मनाशी निगडीत आहेत. म्हणूनच डॉक्टर कोल्हटकरांनी त्याला भारतीय मानसशास्त्र म्हटले आहे. या योगसूत्रांत आसने व प्राणायाम यांचाही उल्लेख आहे, पण तो अतिशय तोकडा आहे. त्यासाठी मात्र 'हठयोग प्रदीपिका' व 'घेरंड संहिता' याकडे वळावे लागते. (माझा पातंजल योगसूत्रांचा अभ्यास फारसा नाहीच. परंतु त्यातील अष्टांगयोग आरोग्याशी पूर्णतः निगडीत असल्यामुळे त्याचाच मी थोडाफार अभ्यास केला आहे. कारण माझा आवडता विषय आरोग्य हा आहे.) सांख्य, योग, न्याय, मीमांसा आणि वेदान्त या षड्दर्शन ग्रंथांमध्ये सांख्य आणि योग ही प्राचीन आहेत. पतंजली योगाविषयी चर्चा करतात. अष्टांग योगापुरती चर्चा आपण जरुरीनुसार त्या त्या वेळी करू. यातील यम, नियम, आसन व प्राणायाम ही चार अंगे वा दैनंदिन कार्य म्हणजेच बाह्यांगाबद्दल चर्चा केली गेलेला महत्त्वाचा भाग. प्रत्याहार म्हणजे योगाचे पाचवे अंग. प्रत्याहारामुळे इंद्रिये अंतर्मुख व्हायला लागतात. हा साधला म्हणजेच मनुष्याची इंद्रियसुखाच्या ओढीची तीव्र इच्छा नाहीशी होते. मनुष्य इंद्रियांचा गुलाम न राहता ती मनुष्याची गुलाम बनतात व त्याच्या आज्ञेप्रमाणे वागू लागतात म्हणून प्रत्याहार हा पूर्ण आल्यावर, यम, नियम, आसन, प्राणायाम ह्या बहिरंग व ध्यान, धारणा, समाधी या योगाच्या अंतरंगाचा संगम होऊ शकतो. अष्टांग योगाच्या पहिल्या पांच अंगांचे विवरण साधनपाद या दुसऱ्या पादामध्ये आहे तर ध्यान, धारणा, समाधी विभूतिपाद या तिसन्या पादामध्ये आहे. हे बहिरंग पूर्णपणे काबूत आल्याशिवाय अंतरंगाचा अभ्यास म्हणजे होऊ न शकणारी कहाणी ठरेल. डीन ऑर्निशचे 'रिव्हर्सल ऑफ डिसीज' हे पुस्तक वाचून जे लोक एकदम ध्यान करण्यास सांगतात ते बरोबर नाही. असे ध्यान नीट होऊच शकत नाही. मग ध्यानामुळे गुण कसा येणार ?

२५३