पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहार- ज्याला आपण सात्त्विक म्हणू आणि पूर्ण मल व मूत्र विसर्जन ही अंतः शुद्धी. तिसरा नियम म्हणजे तप तप म्हणजे शरीराला ताप देणे नव्हे. उपास, तापास, एका पायावर उभे राहून आराधना हे फक्त शरीरक्लेश आहेत. याने फारतर थोडी सहनशक्ती वाढेल पण अपाय जास्त होईल. तप म्हणजे सहज, नैसर्गिक वर्तणूक एवढाच अर्थ घ्यावा लागेल. चौथा नियम म्हणजे स्वाध्याय, यात अध्यात्माचा अभ्यास व चिंतनामधून ज्ञान मिळवणे व वैयक्तिक उन्नतीसाठी नित्यजीवनाचे अभ्यासाने ज्ञानप्राप्ती. एकूण जीवनातील काही गोष्टी पालनास योग्य, उपकारक व काही वर्ज्य असे का? याची पटणारी कारणमीमांसा जर समजली तर त्यांचे पालन सोपे जाते व नियमित पालनाने ते न कळत होणारे जीवनाचे अंग होऊन जाते. आयुर्वेदातील पथ्य-कुपथ्य आरोग्यासाठी अवश्य असते. त्याची कारणमीमांसा सहज समजली तर आनंदाने, श्रद्धेने त्याचे पालन होते. पण " मी सांगतो म्हणून करा" ही हुकूमशाही त्याचे नीट पालन होऊ देत नाही. वरील चार नियम जो पाळतो त्याला ईश्वरप्रणिधान म्हणजे समर्पणभावना जमू लागते. ईश्वर देवळात भेटत नाही, तो आपल्यातच आहे. कोणत्याही गोष्टीचा गर्व न करता 'अहं' विसरून कार्य करणे म्हणजेच समर्पणभावना. आसन व प्राणायाम :
 पातंजल योगसूत्रांत यांचा फारच थोडा उल्लेख आहे. ते प्रदीर्घ चर्चेने सांगितले आहे ते 'हठयोग प्रदीपिका' या व 'घेरंड संहिता' या ग्रंथांत. आसनामुळे शरीराची लवचिकता, प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढते. प्राणायामानेही श्वसनसंस्था उत्तम कार्य करू लागते. दम्यासारखा रोगही बरा होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होते. एकूण आसन व प्राणायाम यामुळे शरीरस्वास्थ्य व मनःस्वास्थ्य लाभते. मनुष्याच्या देहांतर्गत एक महान विश्व आहे. निसर्गात सर्वत्र शांती भरलेली आहे. कोणतीही प्रचंड खळबळ, नैसर्गिक ध्वनीपेक्षा वेगळे आवाज असे तेथे काहीही आढळत नाही. येथे पक्षी सुस्वरे गात असतात, प्राणी आपले जीवन नैसर्गिकपणे जगत असतात. त्यांचे वैयक्तिक व एकूणच जीवन शांत व नैसर्गिक असते. तसेच आपले अंतर्विश्वही शांत असते. त्याच्या दैनंदिन कार्यात एक लय असते, अत्यंत मंद संगीत असते. तेथे अचानक खळबळ माजते ती विकारांच्या हल्ल्यामुळे. वेदना, मनःस्वास्थ हरपणे हा शरीराचा विलाप असतो, मदतीची तीव्र हाक असते.

२५५