पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाघासारख्या मांसाहारी प्राण्यांनी जेव्हा त्यांचे भक्ष्य पकडलेले असते, तेव्हा ते विलाप करू लागते, बांधवांना मदतीची हाक देते. आपल्या शक्तीनुसार बच्च्यांची आई किंवा इतर जमातबंधूही धावून जातात व मदत करण्याचा प्रयत्न करतात. तीच स्थिती आपलीही होत असते.
शरीर विलाप करू लागले की प्रथम आपल्या तोंडातून उद्गार बाहेर पडतो तो “अग आई ग!' मग आपल्यावर माया करणारी माणसे जवळ येतात, त्यांचा स्पर्श, त्यांची सहानुभूती ह्यामुळे आपल्या वेदनांची तीव्रता कमी होत असते.
हीच वृत्ती प्राणीजगतात आढळते. एका प्रसिद्ध शिकाऱ्याने लिहून ठेवलेली एक कहाणीच पाहू या. वाघाच्या शिकारीच्या बऱ्याच पद्धती अस्तित्वात होत्या. त्यांपैकी एक म्हणजे एखाद्या झाडावर मचाण बांधून ते दिसणार नाही, अशी व्यवस्था करून शिकारी त्यात लपून बसत असे. एखादे रेडकू भक्ष्य म्हणून बंदुकीच्या सहज टप्प्यात खाली खुंटी मारून त्याचा पुढला पाय बांधून ठेवले जाई. अशाच एका प्रसंगात वाघ येताच रेडकाने तिकडे तोंड फिरवले व हल्ला होताच जोराने रेकून आवाज काढला. तो आवाज ऐकून जवळच चरत असलेला एक रेडा धावून आला व त्या वाघाला त्याने हुसकावून लावले व तेथेच रेडकाच्या रक्षणासाठी बसून राहिला. वाघ परत आला. तो येताच रेडा परत धावून गेला व वाघाला हुसकावून लावले. असे तीन- चार वेळा होताच वाघाने त्या रेड्यावर हल्ला केला व त्याला ठार मारले. वास्तविक वाघ हा आपला मारेकरी आहे हे प्रत्येक प्राण्याला माहीत असते परंतु असे असूनही त्या रेडकाच्या संरक्षणार्थ लढून त्याने जीव दिला. हे केवळ त्या बच्च्याच्या हाकेला उत्तर म्हणून झाले. विकाराच्या हल्ल्यातही मनुष्य वेदनेने तळमळतो व त्याला स्पर्श, सहानुभूती, गोड शब्द यांनी सुद्धा उतार पडू शकतो. आज विकारांच्या चाचण्यांसाठी अनेक नवीन यांत्रिक साधने आली आणि डॉक्टर, नर्सेस यांचीही यंत्रे झाली आहेत. विकारमुक्तीच्या कार्यात त्यांचा काहीही सहभाग राहिलेला नाही. पुढे आपण यावर दीर्घ चर्चा करूच.
 आसने व प्राणायाम, व एकूणच योगसाधना आरोग्य देत असल्यामुळे असा विकारहल्ला होण्याचे प्रमाणही कमीच होत जाते. (माझ्या 'मागोवा आरोग्याचा' ह्या पुस्तकात आसने व प्राणायाम याविषयी थोडी जास्त माहिती दिली आहे. प्राणायामाचे सर्व प्रकार, कृती व फायदे हे त्यात दिले आहेत.) आसने व प्राणायाम

२५६