पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

योग्य रीतीने केल्यास जसा उत्तम फायदा होतो, तसा अयोग्य रीतीने केल्यास तोटाही होऊ शकतो, ते अनारोग्याला आमंत्रण ठरते, हे विसरता कामा नये.
 "प्राणायामेन युक्तेन सर्व रोगक्षयो भवेत् ।
 अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोगो समुद्भवः ॥२-१६॥"
 ही पतंजलींनी दिलेली सूचना गांभीर्यानेच घेतली पाहिजे. प्राणायामावर अनेक लेखकांनी पुस्तके लिहून त्याचे निरनिराळे पैलू दाखवले आहेत. माझा विश्वास व थोडाफार अभ्यास लोणावळ्याच्या 'कैवल्यधाम' या संस्थेने स्वीकारलेल्या पद्धतीचा आहे. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी नागपूर येथे असताना जनार्दन स्वामी यांच्याकडूनही अनेक गोष्टी शिकलो. जनार्दन स्वामी हे संन्यासी व स्वामी विवेकानंदांचे अनुयायी व त्यांना मिळालेल्या आज्ञेप्रमाणे ते हेच कार्य करत असत. घेरंड संहिता, हठयोग प्रदीपिका व योगोनिषद यामध्ये दहा प्राणांची माहिती सांगितली आहे. ती फार महत्त्वाची आहे.

२५७