पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्राणायाम अयोग्य रीतीने केल्यास अपाय होऊ शकतो. म्हणूनच बहुधा पतंजली म्हणतात की यम, नियम, आसन, प्राणायाम ही अष्टांगयोगाची चार अंगे प्रथम स्थानी येतात. ह्या अंगांवर पूर्ण ताबा मिळाल्यावरच पुढील अंगे अनुसरावीत. ह्या चार अंगांनंतरच प्रत्याहार येऊ शकतो आणि तो साध्य झाल्यासच ध्यानधारणा करणे जमेल व त्याचा फायदा होईल. या चढत्या भाजणीप्रमाणेच साधना होणे जरुरीचे आहे. नाहीतर ध्यान होऊच शकत नाही. ध्यानाचे हल्ली अनेक वर्ग सुरू झाले आहेत. अनेक आश्रमांची व स्वामींचीही भरपूर प्रसिद्धी होत आहे. शिबिरे भरवूनही भरपूर पैसे मिळवणारे लोक आहेत. मला या लोकांचा राग येत नाही. त्यांना आपण फार तर स्वार्थी म्हणू या. पण खरी कीव करावीशी वाटते ती आपण ज्याची भरपूर जाहिरात केली जाते ती पाहून वाहून जातो त्याची. आपल्याला खरी गरज कशाची आहे व त्याचे मार्ग काय? ह्याचा विचार करून त्या मार्गाचा नीट अभ्यास करणे हेच योग्य ठरते. गुरूची जरुरी आहे ती मार्गदर्शनासाठी. त्याचेवरच सर्व भार टाकून स्वस्थ बसणे हे कधीही यश देणार नाही 'ध्यान' केल्यापासून निश्चित फायदा होतो पण त्यासाठी यम, नियम, आसन, प्राणायाम याची पूर्वतयारी करून ती आपली दैनंदिनी करणे ही ध्यानाची पूर्वतयारी आहे. स्पर्धात्मक खेळामध्ये जसा कित्येक दिवस पूर्वतयारी व अभ्यास करावा लागतो, नियमितपणे सराव ठेवावा लागतो व स्पर्धेपूर्वी शरीर सैल करणे (Warm up) जरूर असते, तीच गोष्ट येथेही लागू पडते. आसनापूर्वी सुखासनात वा वज्रासनात बसून अनुलोम-विलोम हा प्राणायाम करणे जरुरीचे असते. आसन, प्राणायामाचा दैनंदिन कार्यक्रम संपल्यावर शवासन करावे. या शवासनात सुद्धा उत्तम ध्यान होऊ शकते. ध्यानासाठी अमुक एक आसन पाहिजे असे नाही. वयोमानानुसार व पतंजलींच्या सल्ल्याप्रमाणे 'स्थिर सुख' आसन करावे.
प्रत्याहार :  योगमार्गातील प्रत्याहार हा महत्त्वाचा 'मैलाचा दगड' आहे. येथे योगाचे बहिरंग वळण घेऊन अंतरंगाकडे वाट चालू लागते. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना त्या त्या विषयाकडून परावृत्त करून ध्यानमार्गावाटे समाधीकडे नेणे. पातंजल योगाचे अंतिम ध्येय म्हणजे समाधी म्हणजे कैवल्यप्राप्ती. आपण या योगसाधनेचा आरोग्याच्या.

२५८