पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खरंच ते जाणून घेण्याची इच्छा असेल त्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे हाच श्रेष्ठ मार्ग आहे. विज्ञानात सुद्धा एक एक नवीन शोध लागण्यास वर्षानुवर्षे लागतात. चिंतन लागते, काही वेळा तर आयुष्य खर्च होत असते. मग अध्यात्माचा शोध क्षणात लागावा ही अपेक्षा योग्य आहे का ? या प्रश्नाचे उत्तर आपणच द्यावयाचे असते. इलिआड म्हणते की “ह्या ज्या पूर्वकालीन धारणा होत्या, परंपरा होत्या त्यांत, अनेक गोष्टी भीतिदायक, आश्चर्यजनक व आध्यात्मिक होत्या. आधुनिक संशयात्म्यांनी त्यावर आधुनिक पद्धतीने आक्रमण करू नये हेच योग्य होईल. ' आपणास आज न कळणारी, सहज अनुभवास न येणारी जी अंतर्जाणीव आहे,जी चेतना आहे ती सहज वश होणे अशक्य आहे. त्यासाठी लागते तपश्चर्या. जेव्हा वर्षानुवर्षे अशी तपश्चर्या केली जाते तेव्हाच एक दिवस साक्षात्कार होतो, सिद्धी प्राप्त होतात, चेतना जागृत होते व अंती आत्मज्ञानाचा अनुभव येतो. मानववंश- शास्त्रज्ञांनी अभ्यास करून जे मानवाच्या उत्क्रांतीचे ज्ञान लिखित स्वरूपात ठेवले आहे हे फारच वरवरचे आहे असे वाटू लागते. खरा माणूस आजपर्यंत कोणाला कळला असेल तर तो फक्त आत्मज्ञानी व्यक्तींना. अनेक शास्त्रज्ञांना त्यांच्या वयानुसार व चिंतनातून ही जाणीव झालेली होती. यामुळेच आज आपण आध्यात्मिक बाबीत क्षणात हे खरे का खोटे हे ठरविणे बालीशपणाचे होईल.

 मानव आणि प्राणी या दोघांत समान असणारी गोष्ट म्हणजे अंतर्जाणीव वा चेतना. आजचा मनुष्य प्रत्येक गोष्टीला कारण व परिणाम (cause and effect) हा नियम लावत असतो. तो काल्पनिकपणे काळाचे भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ असे भाग पाडतो. या कल्पनेपलीकडील अंतहीन विश्वालाही मोजमापांच्या मर्यादा घालू पाहतो. काळ व अवकाश (time and space) यांना खऱ्या अर्थाने ना आदी ना अंत. काळ जसा मानवाने भूत, वर्तमान व भविष्य या तीन संकल्पनात विभागला तसेच विश्वसुद्धा तो विभागू इच्छितो. काळाला खऱ्या अर्थाने मोजमाप नाही. दोन घटनांमधील कालाचे अंतर म्हणजे आपली काळाविषयी कल्पना. तशी विश्वाचीही कल्पना आदिमानवकालापासून बदलत बदलत आज आपली पृथ्वी ज्याचा एक छोटासा भाग आहे, त्या गॅलेक्सीपर्यंत येऊन पोहोचली आहे. पण अशा लक्षावधी गॅलेक्सी आहेत असेच शास्त्रज्ञ म्हणू लागले आहेत. असे हे अवकाश. याची संपूर्ण कल्पना आपल्या संस्कृतीच्या आदिकालापासून ऋषीमुनींना

२५