पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 दृष्टिकोनातून विचार करत आहोत. प्रत्याहार म्हणजे विषयसुखापासून निवृत्ती. ही मनाची साथ नसेल तर काही उपयोग होत नाही. विषयसुखाला मनाई नाही. सुवास आवडतो म्हणून नवेनवे सेंटस् वापरणे व ते न मिळाल्यास अस्वस्थ होणे, जिभेचे चोचले सतत पुरवत राहणे, विषयोपभोगाचा अतिरेक व नैसर्गिक प्रजननशक्ती कमी झाली तर निरनिराळी औषधे घेऊन ती इच्छा पुरवीत राहणे या गोष्टी मनाची अतोनात गुलामगिरी आहे. सुख जरूर घ्यावे परंतु त्याची गुलामी नको. लैंगिकसुखाला पातंजली नकार देत नाहीत, परंतु ब्रह्मचर्य म्हणजे संयमित सुख हेसुद्धा 'धर्मे च अर्थे च कामे च' अशी शपथ ज्या जोडीदाराबरोबर घेतली, त्याच्या बरोबरच व त्याच्या संमतीने. नाहीतर झाडाचे पिकले पान जसे नकळत निसर्गत: गळून पडते, पण जेव्हा तीच पाने ओरबाडून घेतली तर झाडाला सुद्धा वेदना होतात. आज समाजात स्त्रियांवर जे लैंगिक अत्याचार होतात ते याच ओढीतून. याला कायद्याने आळा घालता येणार नाही. पुरुषसमाजाची मानसिकताच बदलणे आवश्यक आहे. कायद्याने किंवा शिक्षेने ती इच्छा दबते व मोका मिळताच परत ती वर उफाळून येते. त्यामुळे या गुन्हेगारावर शिक्षेबरोबरच मानसिक उपाय- योजना आवश्यक असते. हाही एक गंभीर विकार म्हणूनही पाहणे जरूर आहे. प्रत्याहार हे शिकवतो.
प्रत्याहाराचा उत्तम उपाय म्हणजे इंद्रियसुखाकडे तटस्थपणे, सावधचिताने पाहावयास शिकणे. 'सर्वात आहे पण कशातच नाही' ही वृत्ती अंगी अभ्यासाने बाणवणे. कृष्णमूर्तींनी यालाच तटस्थ निरीक्षण असे म्हटले आहे. यातूनच चित्ताला जाण येत असते. विषयोभोगासंबंधी एक प्रसिद्ध श्लोक आहे.

 न जातुः कामः कामानामुपभोगेन शाम्यति ।
 हविषा कृष्णवर्त्येव भूय एवाभिवर्तते ॥

उपभोगाने वासनेची तृप्ती कधीच होत नाही. उलट अग्नीमध्ये तुपाची धार सोडल्यावर जसा तो उफाळून वर येतो तशी विषयवासना वाढतच असते.

"ततः परमावश्यतेन्द्रियाम् ॥२-५५॥”
२५९