पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्यामुळे प्रत्याहारामुळे-साधकाला इंद्रिये पूर्णपणे वश होतात. आसने आणि प्राणायाम यांच्या साहाय्याने 'अन्नमय कोश' साधनेसाठी पूर्णपणे निरोगी होऊन चपळ होतो आणि प्राणमय कोश (प्राणायामामुळे) एकसंघ होतो. जीवनशैली शिस्तबद्ध, नैसर्गिक नियमांना अनुरूप होते ती यम-नियमामुळे, अंती निरामय जीवनाचा लाभ होतो. येथे योगसूत्राचा द्वितीय पाद (भाग-अध्याय) पूर्ण झालेला आहे.
ध्यानधारणा :
 धारणा हा ध्यानासाठी लागणारी एकाग्रता साधण्यासाठी आपल्या आवडीचा निवडलेला विषय. हा विषय बाह्य किंवा आंतरिक कसाही असला तरी फरक पडत नाही. कोणी राम, कृष्ण, शिव, दत्त, गणपती अशा एका देवाची मूर्ती सातत्याने मनश्चक्षूंनी पाहतील. कोणी अश्वत्थ वृक्ष, वटवृक्ष, औदुंबर अशा पवित्र वृक्षांची निवड करतील. कोणी एखाद्या मंत्राची निवड करतील तर कोणी विकाराची बाधा झालेल्या अंतरीच्या अवयवांची निवड करतील. ह्यामुळे विकारमुक्तीसुद्धा मिळू शकते हे सिद्ध झालेले आहे. याला पाश्चात्य विद्वानांनी 'ऑटो सजेशन' (Auto Suggestion) किंवा 'इमेजरी' (Imagery) असे नाव दिले आहे. यात मनश्चक्षूंपुढे त्या इंद्रियाचा आकृतिबंध आणावयाचा सविस्तर वैद्यकाचा विचार करताना हे आपण पाहू. ही धारणा ध्यान चालू असताना सतत डोळ्यासमोर ठेवणे अगत्याचे आहे. ॐकार ध्यानात तर ॐ कार सनातन नाद हीच धारणा होत असते. धारणा म्हणजे आंतरिक वा बाह्य विषय मन केंद्रित करण्यासाठी घ्यावयाचा असतो. गमतीची गोष्ट म्हणजे भगवान बुद्धाचा शिष्य सारीपुत्त याने धारणेसाठी 'हास्य' हा विषय निवडला होता. हास्याचे सहा प्रकार गृहीत धरलेले आहेत. (१) स्मित म्हणजे चेहरा पाहिला तरच ओळखता येणारे हास्य. याला मंद, आवाजविरहित असे हास्य म्हणूया, (२) हासित - थोडे स्पष्ट हास्य, (३) विहसित - हास्याची किंचित आवाजासह येणारी स्थिती, (४) उपहासित - हात, खांदे, डोके असे शरीर किंचित हलवून येणारे हास्य, (५) अपहासित - हसता हसता डोळ्याला पाणी आणणारे हास्य, आणि शेवटी (६) अतिहासित - शरीर गदगदा हलवून पोट दुखावयास लावणारे हास्य.

२६