पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याचे शरीर झाकल्याप्रमाणे राहते आणि ह्यामुळे तो ज्योतिर्मय देह धारण करणाऱ्या सिद्ध पुरुषांनाही अदृश्य राहतो.

 हे प्रथम मी जेव्हा वाचले तेव्हा माझ्या मनात विचार आला की अशी सिद्धी आपणास मिळाली तर आपण काय करू ? बालपणी शाळेत निबंधलिखाण ही बाब महत्त्वाची मानली जात असे. यात अशा वेळी आपण काय करू या गोष्टी कल्पनेने सांगावयाच्या असतात. 'मी गव्हर्नर झालो तर?', 'मी राजा झालो तर' असे विषय दिले जात. ही कथा बालपणीची. अर्थात निबंधाला इतरही अनेक विषय असत. त्यातून विद्यार्थ्याचे ज्ञान, त्याचा डोळसपणा, स्वभाव याची कल्पना येत असे. पण हे बालपण वृद्धापकाळी सुद्धा तुमच्या मनात दडून बसलेले असते. मग मी जणू जगाचे कल्याण करण्यासाठीच जन्माला आलो आहे अशी क्षणभर कल्पनाभरारी मारली आणि माझा मीच स्वतःला हसलो. ही एक चांगली बाजू झाली. पण त्याची वाईट बाजू म्हणजे अशा सिद्धींचा अत्यंत दुरुपयोग निश्चित होऊ शकतो. याला उत्तर काय? त्या काळात या विषयाचे माझे वाचन फारच थोडे (आजही फारसे नाही). डॉ. कृ. के. कोल्हटकर यांचा पातंजल योगदर्शन हा ग्रंथराज (पृष्ठसंख्या ७८५) मी वाचला नव्हता. मी ही शंका माझे आदरणीय मित्र श्री. मधुकरराव यादर्दी यांना विचारली. त्यांनी दिलेले उत्तर अत्यंत समर्थक होते. ते म्हणाले, “योगसाधनेचे अंतिम उद्दिष्ट कैवल्यप्राप्ती आहे. ही प्राप्ती झाली तरच तो खरा सिद्ध पुरुष होतो. असा सिद्ध पुरुष या सिद्धींचा कधीच दुरुपयोग सोडा, पण उपयोगही करणार नाही. नाहीतर त्या सिद्धी नष्ट होतील. त्या काळी तो निरिच्छ, निर्विकल्प अवस्थेला पोहोचलेला असतो. यामुळेच ही शंका अनाठायी आहे." त्यांनी मला डॉ. कोल्हटकरांचे पुस्तकही दिले. त्यांत पृष्ठे ४९८-४९९ यांतील महत्त्वाचा भाग असा आहे - “सर्व सृष्टी जीवांच्या पूर्वकर्मानुसार ईश्वराच्या इच्छेने निर्माण झाली आहे. सर्व जगत्व्यवहार त्याच्याच इच्छेने चालू असतात. ईश्वर योग्यांचा गुरू असून (पाद १ सूत्र २६) ईश्वरप्रणिधानानेच (पाद २ सूत्रे १ व २) योग्याची योगात प्रगती झालेली असते. तेव्हा जो गुरू आणि ज्याच्या कृपेने आपली प्रगती झाली त्या ईश्वराच्या इच्छेविरुद्ध वागून पदार्थविपर्यास करण्याचे योग्यांच्या मनात येणे शक्य नाही.” एक गोष्ट निश्चित व अनुभवसिद्ध आहे की ध्यानधारणेतून अंतर्मनाची शक्ती वाढते व त्याद्वारा मनुष्य आपली किंवा इतरांची दुःखे कमी करू

२६३