पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाङ्मय उपलब्ध होते ते सर्व त्यांनी अभ्यासले. परंतु मूळ प्रश्नाचे उत्तर कोठेही सापडेना कोणी सांगूही शकेना. तेव्हा तेथून ते चीनला गेले. तेथे त्यांना याचे उत्तर भारतीय तत्त्वज्ञानात, विशेषत: बौद्धदर्शनात मिळेल असे कळल्यामुळे ते उत्तर भारतात आले. तेथे त्यांना या विषयाशी निगडीत उत्तरे मिळाली. अशी वर्षानुवर्षाची शोधयात्रा संपवून ते परत जपानला गेले व नंतर कुरियामा नावाच्या पर्वतावर एकांतात २१ दिवस उपोषण केले. सूत्रांची आवर्तने व ध्यान व चिंतन हा दैनंदिन कार्यक्रम. जास्त खोलात न जाता एवढेच की त्यानंतर त्यांना हस्तस्पर्शाने लोकांना बरे करण्याची सिद्धी प्राप्त झाली. यानंतर त्यांनी अनेक भिकारी व इतर लोकांना व्याधिमुक्त केले. यानंतरचा भाग हा प्रक्षिप्त वाटतो. रेकी घेणाऱ्याने रेकी देणाराला काही मोबदला दिलाच पाहिजे. कारण रुग्ण किंवा गरजू व्यक्तीला कायम उपकृत ठेवणे योग्य नाही, म्हणून त्यांच्याकडून पैसा, भेटवस्तू या रूपाने मोबदला घ्यावा. हा भाग बुद्धीला, मनाला पटत नाही. आपल्या परंपरांत हे नाही. खुद्द गौतम बुद्ध भिक्षेवर जगत असे. त्या कोणाकडून मोबदला घेतला नाही. मग त्याचीच शिकवण अनुसरणारे उसुई यांनी हे सांगितले असणे अशक्य आहे. मनुष्य सिद्धपुरुष झाला तरी या सिद्धी स्वार्थाकरिता वापरणे ह्याची त्याला कल्पनाही सहन होणार नाही. योगी शेवटी निर्विकल्प समाधी प्राप्त करण्याची इच्छा करतो. त्याला ओढ असते ती कैवल्याची. व्यावहारिक फायद्याची नव्हे. ज्ञानेश्वरांना सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी कधीच स्वतःसाठी वापरल्या नाहीत. किंबहुना स्वार्थ साधणे म्हणजे सर्व साधनेचा नाश होय. षड्रिपूंवर विजय म्हणजे साधनेचे फल. तेव्हा उसुई यांच्या तोंडी ते शब्द घालणाऱ्या त्यांच्या शिष्यांनी त्यांना अवनत स्थितीलाच नेले आहे. आज त्याचे काय स्वरूप दिसते? कोठलीही फारशी तपश्चर्या न करता रेकी योग्य फी देऊन शिकता येते. सिद्धी म्हणजे काही वस्तू नव्हे जी पैसे देऊन विकत घेता येईल. लोककल्याणाची विक्री करणे हा देवाघरचा गुन्हाच आहे. रेकी देण्यासाठी शेकड्यापासून हजारो रुपये घेणे म्हणजे लोकांच्या श्रद्धेचा उपयोग करून स्वार्थ साधणे. लोकांची ही अंधश्रद्धा व त्याचा फायदा घेणारे हे भोंदू बुवा किंवा स्वामीच आहेत.

 आधुनिक काळातील या पार्श्वभूमीवरील एक कहाणी सांगतो. मध्यप्रदेशात सिंग नावाचे एक सिद्धपुरुष होते. बालपणापासून व्यावहारिक शिक्षणाकडे लक्ष

२६८