पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होती.ऋग्वेदाच्या हे नासदीयसूक्तात आहे.लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्य या ग्रंथात मूळ संस्कृतचे मराठीकरण केलेल्या पाने २२७ व २२८ यावर ते आहे. आपण फक्त तोंडओळख करून घेऊ."तेव्हा म्हणजे मूळारंभी असत् नव्हते आणि सतही नव्हते.अंतरिक्ष नव्हते आणि त्या पलीकडचे आकाशही नव्हते. अशा स्थितीत कोणी (कोणाला ) आवरण घातले (म्हणावे)".ह्या एकूण सात ऋचा आहेत.पं.नेहरूंच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पुस्तकांतही आलेले आहे.जिज्ञासूंनी पाहावे.अशा अनेक संकल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत.मनुष्य अदृश्य होऊ शकतो,आजची एक वैज्ञानिक कल्पना वा काल्पनिक गोष्ट. यावर अनेक सिनेमा निघालेले आहेत.क्षणात लक्षावधी मैल प्रवास करणे ही अशीच दुसरी कल्पना.येथे अदृश्य होऊन अणुरूपाने दुसरीकडे जाणे व तेथे परत आपले रूप घेणे हे काही सिनेमांत (Fiction) आपण पाहिलेले आहे. मग ह्या गोष्टी फार पूर्वी शक्य होत्या असे कोणी म्हणेल तर त्याला हास्यास्पद ठरवण्याचे काही कारण नाही.हे जे संपूर्ण विश्व व्यापणारी चेतना आहे,जी अंतर्ज्ञानाची जाणीव आहे,तीच सर्व विश्वाला व्यापून उरली आहे,असे त्या वेळी चिंतनातून सापडलेले सत्य आहे.पुढे आपण याविषयी प्रदीर्घ चर्चा करूच.ही जी चेतना आहे तीच मनुष्य व प्राणी यांना जोडणारा समान दुवा आहे.मनुष्याला आपले रूपांतर प्राण्यात करून घेता येते अशी 'शमान' धर्मीयांची नुसतीच कल्पना नव्हती तर श्रद्धा होती.कधी कधी हे लोक जसे प्राण्यांशी बोलू शकत होते,तसे प्राणीही त्यांच्याशी बोलू शकत असत आणि त्याची सुरुवातही प्राणी करू शकत.
 शमान पंथाच्या या कल्पना म्हणजे ती व्यक्ती मानसिक दृष्ट्या विकृत किंवा मनोरुग्ण असावी असा कोणाचाही समज नव्हे खात्री होईल.परंतु ह्या व्यक्ती त्या विशिष्ट काळानंतर संपूर्णपणे तुम्हा आम्हासारख्या सामान्य असत. एस्.एफ.नाडल यांनी सुदानी टोळीचा या दृष्टिकोनातून अभ्यास केला होता.ते म्हणतात,“दैनंदिन जीवनात कोणीही शमान ( मांत्रिक) ही विकृत व्यक्ती नसते.तसे असते तर त्याला ‘वेडा' किंवा मनोरुग्ण म्हणावे लागले असते, कोणीही त्यांना साधू,गुरू किंवा धार्मिक नेता मानले नसते.मला अशा कोणत्याही व्यक्तीमध्ये कोणतीही विकृती आढळली नाही.कोणीही अशा गोष्टी स्वतःला मोठेपणा मिळविण्यासाठी किंवा स्वार्थ साधण्यासाठी करत असे." आपल्याकडेही तंत्र,मंत्र विद्या जाणणारे किंवा २६