पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हजार वेळा भरकटत असेल, तर ते जपाचे कर्मकांड झाले आणि हेच आपण करतो. समजा, मन निर्विकार करून जर आपण एका वेळेस पन्नासच वेळा जप करत असू तर त्या काळापुरतेच ध्यान सफल, संपूर्ण झाले असे म्हणण्यास हरकत नाही. हा काळ हळूहळू वाढवत दहा मिनिटे, पंधरा मिनिटे असा काळ जाऊ लागला म्हणजे ध्यान बऱ्या तऱ्हेने होऊ लागले असे म्हणण्यास हरकत नाही.
 हीच गोष्ट मानसपूजेची. पूजेची परंपरेने चालत आलेली रीत आजही आपण पाळतो. परंतु देवमूर्ती देव्हाऱ्यात ठेवून, त्यांची रोज पूजा करणे हे जर भक्तिभाव, श्रद्धा व एकात्मता होऊन होत असेल तर ती पूजा सफल झाली. येथे देवमूर्ती व त्यावर केलेले उपचार ही धारणा, व त्यावर केंद्रित मन ही गोष्ट म्हणजे ध्यान. ह्याविना केलेली पूजा फक्त कर्मकांड असते. किंबहुना अशी पूजा करण्याचेही कारण नाही. षोडशोपचारे केवळ मनाने केलेली पूजा - म्हणजेच मानसपूजा ही श्रेष्ठच आहे. मानसपूजेवर एक कहाणी मी लहानपणी वाचली होती. ती मी 'मागोवा आरोग्याचा' ह्या माझ्या ग्रंथात सांगितली आहे. तीच परत येथे सांगतो. एक संत होऊन गेले (नाव आठवत नाही) ते कर्मकांडाच्या विरुद्ध होते. ते नियमितमानसपूजा करावयाचे. त्यांचे काही भक्त या वेळी श्रद्धेने हजर असत. ह्या संतांनी मनाने देवाला स्नान घातले की देवावर अभिषेक केल्याचा मंद आवाज येत असे. गंध लावले की गंधाचा वास, फुले वाहिली की फुलांचा वास, धूपदीपाचा वास, घंटानादाचा आवाज, नैवेद्य दाखविला की नैवेद्याचा वास भोवतालच्या भक्तांना येत असे. वैज्ञानिक दृष्ट्या हे अशक्य आहे असेच आपण म्हणू. पण अंतर्मनाच्या शक्तीची आपणास जाणच नसते. काही लोकांना ही जन्मजात देणगीही असू शकते.

मागे वर्तमानपत्रात अशा अनेक कहाण्या आल्या होत्या. एका अमेरिकन माणसाला मानसशक्तीने कोणती वस्तू कोठे आहे, कोठे काय चालले आहे ह्याचे चित्र डोळ्यांसमोर आणता येत असे. त्याच्या या शक्तीचा उपयोग करून घेऊन नेव्हीने एक बुडालेल्या गलबताचा शोध लावला होता. एक ज्यू तरुण दृष्टी एकाग्र करून सुरीची कागदाप्रमाणे घडी घालत असे. आधुनिक काळातही अशा स्वप्नातही खऱ्या न वाटणाऱ्या कहाण्या मागे आपण पाहिल्या व पुढेही पाहू. अर्थात आपला विषय आरोग्य, वैद्यक व अध्यात्म यांच्या पुरत्याच त्या मर्यादित आहेत. दैवी घटनांची येथे चर्चा नाही.

२७०