पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ध्यानधारणेचे निरनिराळे प्रकार आपण पाहिले. हेच आपल्याला निरनिराळ्या धर्मातही आढळते. पण प्रकार काही असो त्याची पूर्वतयारी म्हणून आपली दैनंदिनीसुद्धा निसर्गनियमानुसार झाली पाहिजे. पातंजल योगसूत्रांतील यम, नियम, आसन, प्राणायाम हे बाह्यांग आपण सहज अमलात आणू शकतो. आणि सुरुवातीस त्याची अंमलबजावणी जरी जाणीवपूर्वक करावी लागली तरी सवयीने व नियमित पालनामुळे तो आपल्या दैनिक आचरणाचा भाग होऊन जातो. आपल्या शरीरात एक घड्याळ आहे त्याला सतत मागेपुढे न करण्यामुळे सातत्य येत असते व आपल्या न कळत दिवसभराच्या प्रत्येक कार्याची ते जाणीव करून देत असते. ठराविक वेळी आपला जठराग्नी प्रज्वलित होतो, ठराविक वेळात अन्नपचन होते. वेळ होताच आपसूक डोळे मिटू लागतात, झोप शांत लागते व दुसऱ्या दिवशी ठराविक वेळी जाग येते व उत्साहाने आपला दुसरा दिवस सुरू होतो. यामुळे आपले आरोग्य उत्तम राहते. एवढे करूनही आपण जन्मभर निरोगी राहू, आरोग्याचे सातत्य कायम टिकवता येतेच असे नाही. परंतु आजाराच्या कालखंडात आपली स्वसंरक्षणक्षमता चांगली असल्यामुळे आजाराची मुदत फारच थोडी असते. त्यातून इतर कोणत्याही गुंतागुंती निर्माण होत नाहीत. अनारोग्य व आरोग्य यांच्या कालखंडाचा आयुष्यभराचा आलेख आपण काढला तर तो पुढीलप्रमाणे येईल -

हा काल्पनिक आलेख देण्यामागे मनुष्य संपूर्ण निरोगी किंवा संपूर्ण रोगी असा दीर्घ कालखंड कधीच नसतो, परंतु निरोगी स्थिती जेवढा जास्त काळ राहील तेवढे जीवन 'निरायम' होत असते, हेच दाखवणे हा हेतू आहे.

२७१