पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तणावामुळे अनेक गंभीर विकार होऊ शकतात हे आता विज्ञानमान्य झाले आहे. हा आधुनिक मानसशास्त्राचा एक भाग आहे. याचे महत्त्वाचे दोन भाग पाडले गेले आहेत. (१) सैद्धांतिक व (२) उपयोजित. यातील वैद्यक व आरोग्य याच्याशी निगडीत व व्यावहारिक उपयोगितेचा भाग म्हणजे 'उपयोजित मानसशास्त्र'. मानसशास्त्र हे खऱ्या अर्थाने मानव व प्राणी यांच्या वर्तनाचे शास्त्र आहे. वर्तणूकविषयक मूलभूत सिद्धांतांचा आधार घेऊन दैनंदिन समस्या सोडविणे हेच मानसशास्त्राचे प्रयोजन आहे असे म्हटले जाते. यात मानवाच्या वर्तनाचा अभ्यास व मनोविकृतीचे निदान असे महत्त्वाचे दोन भाग पाडता येतील, जे आपल्या चर्चेशी निगडीत आहेत. मनच जर आजारी असेल तर निरामय जीवनाची अपेक्षाच अयोग्य ठरेल. निरोगी मन, निरनिराळ्या संकटकाली सुद्धा ते शांत ठेवण्याची कला साध्य करून घेणे हे आपल्याच आरोग्यासाठी अत्यंत निकडीचे आहे. हा विषय इतका मोठा आहे की त्यासाठी प्रदीर्घ अभ्यास व अनुभव यांची जरुरी असते. तेवढे खोल जाणे हा आपला उद्देश नाही.
आरोग्यविषयक मानसशास्त्र :

 ह्या मानसशास्त्राच्या भागात मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा अभ्यास केला जातो. आहार हाही मन घडवत असतो व आहार शरीराचे पोषणही करत असतो. तेव्हा आहार व व्यायाम ह्या गोष्टी सुयोग्यच व्हावयास पाहिजेत. त्यात सदोष आचरणही आले. आजच्या धकाधकीच्या जीवनातील ओढाताण, अयोग्य दिनचर्या या गोष्टींचे परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतात. मानसिक ताण किती गंभीर आजार निर्माण करू शकतो? (१) आम्लपित्त व त्यातून उद्भवणारे जठरव्रण. यातून कर्करोगसुद्धा निर्माण होऊ शकतो. (२) अपचन व अपूर्ण पोषण, (३) त्वचाविकार, (४) रक्तदान, (५) हृदयरोग, (६) स्त्रियांच्या जननसंस्थेच्या तक्रारी, (७) निरनिराळे कर्करोग, (८) निद्रानाश, (९) भूक, अशा शारीरिक विकृती व (१) छिन्नमनस्कता (Schizophrenia), (२) अवसाद अवस्था (Depression) (३) ओ.सी.डी. (Obsessive Compulsive Disorders) वगैरे अनेक मानसिक रोगही निर्माण होत असतात. व्यक्ती निरुत्साही, उदास, चिडचिडी, संतापी, तक्रारखोर अशी ताणातूनच बदलत असते. लहान मुले व विद्यार्थीही ताणाचे बळी पडत असतात.

२७३