पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परीक्षेची भीती, अभ्यासात लक्ष केंद्रित न होणे, रात्री अंथरुणात 'शू' करणे अशी उदाहरणे आपण पाहतो तेही ताणाचेच परिणाम असतात. यामुळे त्या सर्वांचा परिणाम वर्तनावर होत असतो. हा ताणाला दिला जाणारा प्रतिसाद म्हणता येईल. हा प्रतिसाद किंवा बदल कसा व्यक्त होतो?
 (१) वर्तनातील लवचिकपणा कमी होणे / काठिण्य (Rigidity) :
सर्वसाधारणपणे आपली वृत्ती अशी असते की आपण दुसऱ्याच्या भावनांचा विचार करतो, त्याला समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. ही सहजप्रवृत्ती म्हणजे लवचिकता, तीच नष्ट होते. अनिश्चितता, संदिग्धता सहन न होणे म्हणजेच काठिण्य. पुष्कळ वेळा आपण काही गमावणार आहोत, यामुळे आपल्याच विचारांना घट्ट चिकटून राहणे, ही काठिण्याची खूण.
 (२) दूरत्व / माघार (Withdrawal) : निरुत्साही, खिन्न, भीतीच्या दबावाखाली हालचाल, एकान्तात राहण्याची इच्छा, सार्वजनिक किंवा समारंभापासून दूर राहण्याची इच्छा, लोकांचा जमावसुद्धा नको वाटणे, मादक द्रव्यांच्या आहारी जाऊन सर्व विसरण्याचा प्रयत्न ही महत्त्वाची लक्षणे. झोपडपट्टीतील पुरुष अथवा अत्यंत गरीब कुटुंबातील पुरुष दारुडे का बनतात? याला तशी बरीच कारणे आहेत. परंतु घरी आले की सुरू होणाऱ्या कटकटीपासून मुक्तता मिळविण्यासाठी व्यसनाधीन होणे हेही कारण आहे. भरपूर दारू पिऊन 'विमान चंद्रावर' पोहोचले की आपण जगाचे राजे झालो आहोत असे त्यांना वाटू लागते. पण दुसरे दिवशी नशा उतरली की मग पाय परत जमिनीवर येतात.
 (३) आक्रमकता (Aggression) : ताणातून मुक्ती मिळवण्यासाठी माणसे अतिशय आक्रमक होऊ शकतात. वैचारिक मतभेद, खोट्या धार्मिक कल्पनांपायी संघर्ष निर्माण करणे, दंगली, हिंसाचार अशा सामान्य माणसांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या गोष्टी घडू शकतात. धर्मलंड प्रवृत्तीच्या पाकिस्तानी अतिरेक्यांचे उदाहरण आपण पाहतोच आहोत.

 (४) आयुष्यातील काही घटना (Life Events) : प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे सुख-दुःखाचे मिश्रण आहे. "सुख पाहता जवाएवढे दुःख पर्वताएवढे", ही थोडी अतिशयोक्ती असली, तरी काही काही घटना मनावर कायमच्या कोरल्या जातात.

२७४