पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(१) कौटुंबिक आधार :
 मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. मोठ्या समाजाचे छोटे स्वरूप म्हणजे कुटुंब. जसे ब्रह्मांडाचे छोटे स्वरूप म्हणजे पिंड, तसेच हे रूप मानण्यास हरकत नाही. मनुष्याची आंतरिक इच्छा अशी असते की आपल्या सुख-दुःखांत सहभागी होणारे कोणीतरी असावे. व्यवहार व मानसिकता या दोन्ही गरजा पूर्ण करणारी छोटी संस्था म्हणजेच कुटुंब. ताणतणावांच्या सुयोग्य समायोजनाचे कुटुंब हे एक महत्त्वाचे साधन आहे.
(२) मित्र - मैत्रिणी:
 मैत्री म्हणजे प्रत्यक्ष कुटुंबाचा घटक नसूनही एखादी व्यक्ती तुमच्या सुख-दुःखांत वाटेकरी असते. असे म्हटले जाते की आपल्या अडचणीच्या काळात जो धावून येतो तो खरा मित्र. यामुळे खऱ्या अर्थाने आपले मित्र बोटावर मोजण्याइतकेच असतात. मनाचा ताण ते संकट आपल्या मित्राला नुसते सांगण्यामुळे सुद्धा हलका होत असतो. हेच खरे मैत्र.
(३) सामाजिक संस्था :

 सामाजिक संस्था ही म्हणजे दगड-विटांच्या चार भिंती नव्हेत. कोठलीही संस्था म्हणजे त्यात निरपेक्षपणे, माणुसकी जपून, सामाजिक कर्तव्यांची जाण ठेवून समाज वा व्यक्ती यांच्या भल्यासाठी काम करणाऱ्या अशा अनेक व्यक्ती एकत्र येऊन काम करणारी संघटना, यात नीती व त्याग यांचा फार मोठा वाटा असतो. आणि ज्या वेळी ह्या दोन गोष्टी नष्ट होतात तेव्हा ती संस्था संस्था न राहता राजकारण, स्वार्थ, भोगवाद यांचा अड्डा होतो. तेव्हा खऱ्या सामाजिक हा ताणतणाव कमी करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. अशा संस्थांमध्ये सहभाग असेल तर त्यातून एक प्रकारचा आनंद - याला आपण स्वानंद म्हणू या तो मिळत असतो. स्वानंद ही एक उच्च भावना आहे. रचनात्मक कार्यासाठी ह्याचा पाया असेल तर ताणतणाव नाहीसे होण्यास मदतच होते. राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर या भावना ताणतणाव वाढवतात तर प्रेम, माया, खरे मैत्र या उच्च भावना हीन भावनांवर मात करतात व या हीन भावनांतून निर्माण होणारे ताणतणाव निर्माणच होणार नाहीत. निदान ताणांचे उत्तम व्यवस्थापन करण्यास साहाय्यभूत होतात.

२७६