पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आरोग्य :
 आरोग्य म्हणजेच कायिक व मानसिक पूर्ण स्वास्थ्य. हे ताणतणाव निर्माण होऊ लागले तर त्यांना काबूत ठेवते. प्रथम याच्यावरच लक्ष ठेवले गेले पाहिजे.
मूल्ये व आदर्श :
 प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात हे जीवन उन्नत ठेवण्यासाठी काही जीवनमूल्यांचा आधार जरुरी असतो. तशीच कौटुंबिक व सामाजिक मूल्ये ह्यांचे स्थानही उच्च आहे. त्यांचा सन्मान ठेवणे हे महत्त्वाचे. तसेच आपल्यापुढे काही आदर्श असणे महत्त्वाचे.
वैयक्तिक कौशल्ये :
प्रत्येक ऋषि-मुनींनी पूर्वी ‘कोऽहं' या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. व त्याचे उत्तर मिळवले. व्यावहारिक स्तरावर आज याच स्वरूपाचे दोन प्रश्न आपण स्वतःलाच विचारावयास पाहिजेत, असे हे आत्मपरीक्षण आपली आवड काय, आपण कोणत्या गोष्टीत कौशल्य मिळवू शकतो व ते कसे वापरावयाचे हे जाणून घेणे महत्त्वाचे. नाइलाज म्हणून जेव्हा एखादी जबाबदारी अंगावर पड़ते तेव्हा ताण येईलच. परंतु आपली आवड ज्या विषयात आहे तो विषय जर आपणास मिळाला तर त्यातून ताण येणे सोडा पण कितीही कष्ट पडले तरी आनंदच होतो. याला स्वानंद म्हणता येत नाही. वडिलांची इच्छा म्हणून जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला मनाविरुद्ध विषय घ्यावा लागतो तो विद्यार्थी मूळचा तल्लख बुद्धीचा असूनही त्याचे यश हळूहळू खालीच जात असते.
 हे तणाव योग्य रीतीने हाताळण्यासाठी मानसशास्त्र काही मार्ग सुचविते व असे मार्ग कसे अनुसरले जातात हे सांगते.
 (१) दुर्लक्ष करणे : इकडे लक्ष दिले नाही तर काही प्रमाणात ताण विसरण्यास मदत होते.

 (२) व्यसनाधीनता : ताण नाहीसे होण्यासाठी दारू, सिगारेट अशी व्यसने लावून घेणारे लोक आहेत. परंतु अंती ताण जात नाहीतच उलट नवीन व्याधी

२७७