पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निर्माण होतात.
(३) आंधार : मन मोकळे करून दुःख वाटून घेणे. वाटून घेतल्याने दुःख हलके होते व सुखामध्ये मात्र वाढ होत असते. यासाठी खरे मित्र, प्रेमाचे नातेवाईक ही उत्तम माध्यमे ठरतात.
(४) स्वतः ला जाणून घेणे : ताणांना तोंड देण्यास आपण कोठे कमी पडतो हे चिंतनामधून जाणण्याचा प्रयत्न करणे. ते कळले तर या समस्यांपुढे न नमता निश्चयाने प्रतिकार करता येतो.
(५) ताणाकडे अनुभवाच्या दृष्टिकोनातून पाहणे : आपल्याला संतांनी एक महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. देवाची प्रार्थना करा, "देवा मला दुःखे दिलीस याबद्दल माझी काही तक्रार नाही, त्याला खंबीरपणे तोंड देण्याची मला शक्ती दे. हे ताण का आले व त्यांचे परिणाम काय झाले? याचा अनुभव आपल्या गाठीला बांधून त्यातूनच यासाठी आत्मविकास साधणे, हा एक उत्तम मार्ग. परमेश्वराला शक्ती मागणे म्हणजेच स्व-क्षमतांना पूरक उपाय. हेच शेवटी कामी येतात. असे अनेक उपाय शास्त्रज्ञांनी सुचवलेले आहे. पण हे सांगणे जितके सोपे तितकेच अमलात आणण्यास कठीण. आज जीवनच इतके अस्थिर, स्पर्धात्मक व अत्यंत गतिमान झाले आहे की पूर्वी कधीही न येणारी ताणांची पातळी त्याने गाठली आहे. औद्योगिक क्षेत्रातील अतोनात वाढ, त्यातील स्पर्धा, पैसा हाच परमेश्वर मानण्याची वृत्ती यामुळे जीवनाचा खरा अर्थच आपण विसरत आहोत.
औद्योगिक क्षेत्र - ताणतणावांचे व्यवस्थापन :

 औद्योगिक क्षेत्रात जास्तीत जास्त ताण जाणवतात. होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी आज ५०% मृत्यू हृदयरोगाने होत असतात हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे हृदयरोगाचे व्यवस्थापन कसे करावयाचे ह्या विषयाला डॉ. डीन ऑर्निश यांनी तोंड फोडून त्यांची एक व्यवस्थापन पद्धती निर्माण केली. त्यांचे हृदयरोगनिवारण (Reversal of Heart Disease) हे पुस्तक खूपच गाजले. त्यांच्या मताप्रमाणे अँजिओप्लॅस्टी, बायपास हा गोष्टी तात्पुरते उपाय असून त्यांतून इतरही अनेक दुष्परिणाम झालेले दिसून येतात. तुंबा आलेल्या हृदयरोहिण्या नवीन घातल्या किंवा साफ केल्या तरी

२७८