पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वतःला ज्ञान आहे असे म्हणवणारे अनेक लोक अगदी अलीकडच्या काळातही आढळतात.हे लोक अशी शक्ती आहे असा आभास निर्माण करून श्रद्धा बाळगणाऱ्या व्यक्तींना लुटत असतात.हे मात्र भोंदू होते किंवा आहेत व त्यांना बळी पडणारे अंधश्रद्धा आहेत.करणी करणारे,भानामती करणारे,भुते उतरवणारे असे लोक अजूनही कोठे कोठे आढळतात.यांतून त्यांना अफाट पैसा मिळतो, समाजातील अनेक पुढारी,आदरणीय व्यक्ती त्यांचे शिष्य बनतात.पण असे स्वामी प्रत्यक्ष भोंदू असतात.यांचा बुरखा फाडणारे समाजसेवी लोक आजही आहेत.अंधश्रद्धा निवारण समिती हेच थोर कार्य करत आहे.परंतु जेव्हा काही व्यक्ती अत्यंत निःस्वार्थीपणे,कोणाकडूनही कसलीही अपेक्षा न बागळता असे काही काम करतात त्या मानसिक दृष्ट्या खचलेल्या रुग्ण व्यक्तींची सेवाच करत असतात.नाडेलना आढळलेले सुदानी मांत्रिक अशा प्रकारचे होते.असे तांत्रिक हे सामान्य व्यक्तीप्रमाणेच व्यावहारिक जीवन जगत असतात.
 असे असेल तर हे तांत्रिक इतरांच्या पेक्षा वेगळे किंवा श्रेष्ठ कोणत्या निकषावर ठरवता येईल? सत्यपणे त्यांची मानसिक पातळी उच्च असते.मनाची एकाग्रता करण्याची त्यांची शक्ती इतकी अफाट असते आणि बौद्धिक पातळीवरही ते सामान्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचे असतात.उदा.याकूत जमातीच्या सर्वसामान्य लोकांचा शब्दसंग्रह सुमारे चार हजार शब्दांचा असतो तर याकूत शमानांचा शब्दसंग्रह बारा हजार शब्दांचा असतो,असे नाडेल म्हणतो. तो पुढे म्हणतो की,हे शमाम उत्तम गायक,कवी,संगीतज्ञ,धार्मिक नेते आणि व्यावहारिक वैद्य (Doctors) असतात. आपल्या शेकडो वर्षांची परंपरा,जुने साधू,त्यांचे तत्त्वज्ञान आदी गोष्टींची जपणूक करत असतात.नाडेलने अशा एका शमानची कथा लिहून ठेवली आहे."मिचिल हा एक याकूत शमान होता.तो बराच वृद्ध झाला होता.परंतु एकदा त्याने अत्यंत तरुण माणसापेक्षाही उंच उंच उड्या मारल्या,जळते निखारे, काटक्या खाऊन दाखवल्या,स्वतःला सुरीने जखमा करून घेतल्या."
 हे शमान राजकीय व सामाजिक स्तरावरही वरच्या दर्जांचे असतात. वृत्तीने हे गंभीर, वागण्यात हुशार,असे असावे लागतात.हे अहंमन्य, तापट किंवा अनेक गोष्टी गृहीत धरून आचरण करणारे असून चालत नाही.एकूणच हे लोक अत्यंत हुशार असून त्यांच्याजवळ अहंभाव अजिबात नसतो.'मी व माझे' हे दोन शब्द २७