पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्या कायम तशा राहतील अशी खात्री नाही. कमीत कमी दोन ते पाच वर्षांत परत त्या तुंबतात (Blocks) किंवा जास्तीत जास्त त्यांचे आयुष्य दहा-पंधरा वर्षे असते. औद्योगिक क्षेत्रातील अनेकांना वयाच्या चाळिशी-पंचेचाळिशीतच हृदयरोगाचे आघात झालेले आढळले आहेत. डॉ. डीन ऑर्निशच्या पद्धतीचे अनुसरण करण्याचे लोण भारतातही आले आहे. असे अल्पकालीन कोर्सेसही अनेकांनी चालवले आहेत. यांत डीन ऑर्निश यांनी अष्टांगयोग व आहार यावर भर दिलेला आहे. यातील ध्यानधारणेमुळे ताण कमी करण्यास मदत होते यात वाद नाही. परंतु जीवनशैलीमध्ये जो बदल व्हावयास पाहिजे, म्हणजेच यम-नियमांचे कठोर पालन व्हावयास पाहिजे तेच होत नाही. याशिवाय ध्यान म्हणजे मनाची संपूर्ण एकाग्रता, यातूनच हळूहळू मन निर्विकार करण्याची अद्भुत शक्ती निर्माण होते. निर्विकार मन म्हणजे ताणतणावांना तोंड देण्याची शक्ती. मग ताणतणावाचा काही असर होणार नाही. निर्विकार मन, मनःशांती, स्थिर चित्त हे सर्व शब्द समानार्थी आहेत.

 औद्योगिक क्षेत्राच्या विकासाबरोबरच त्याच्याशी निगडीत मानसशास्त्रही प्रगल्भ होत गेले. उद्योगाच्या व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या शिक्षणक्षेत्राचीही प्रगती झाली. त्यासाठीच हल्ली व्यवस्थापन पदवी (M.B.A.) हा विश्वविद्यालयीन अभ्यासक्रम आखण्यात आला. त्या अनेक विषयांपैकी एक म्हणजे वर्तन अथवा वर्तणूक प्रतिसाद (Organizational Behaviour) हा एक महत्त्वाचा विषय. या विषयाचा छोटा परंतु अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे ताणतणावांचे व्यवस्थापन. हे ताणतणाव मूलतः या क्षेत्रात त्या त्या उद्योगाची प्रगती व नफा जास्तीत जास्त ह्या दोन मूलभूत अपेक्षांमधून येत असतात. या अपेक्षा तशा वावग्या आहेत असे म्हणता येणार नाही. पण आज या अपेक्षा जास्तच वाढत आहेत. मोटारवाहनांचेच उदाहरण पाहा ना. पूर्वी फक्त फियाट व अँबेसिडर या दोनच गाड्या मुख्यतः बाजारात होत्या. तामीळनाडूतील 'स्टँडर्ड' ही बाजारात होती पण तिला मागणी थोडी. फियाट व अँबेसिडर यांची मागणी अफाट व पुरवठा कमी यामुळे त्यांची निर्मिती काळ्याबाजारात मोठ्या प्रमाणावर जावयाची. शिवाय त्यांचा दर्जासुद्धा त्यामानाने जरा कमीच. या पार्श्वभूमीवर आजची स्थिती बरोबर उलट आहे. मागणी कमी व पुरवठा अफाट. त्यामुळे प्रत्येक कंपनी अनेक प्रलोभने देत असते. विक्री कमी म्हणजे नफा कमी. त्यातील सर्वच सेवकांवर अतोनात ताण येत असणार. म्हणजेच

२७९