पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यक्तीकडून अपेक्षित निर्मिती वाढत जाते. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, प्रत्येकाची कार्यशक्ती वेगळी असते या मूलभूत मानवी फरकाचा विचारही न करता अत्यंत यांत्रिक व काळ, काम, वेग यांचा फक्त गणिती विचार केला जातो. याचेही अनेक बळी ठरतात. याचा परिणाम म्हणून सेवकांचा सहभाग कमी होत जातो, नेहमीप्रमाणे प्रतिसाद मिळत नाही, कामाची उपेक्षा सुरू होते.
 ताण किंवा स्ट्रेस (Stress) या शब्दाला योगसाधनेत 'क्लेश' असा शब्द वापरला गेला आहे. या क्लेशनिर्मितीची पाच कारणे सांगितली गेली आहेत -
 (१) अविद्या : शिक्षा वा ज्ञान यांचा अभाव
 (२) अस्मिता : अहंभाव, सतत 'मी' - 'मी' हेच महत्त्वाचे मानणे
 (३) राग / क्रोध : सतत चिडचिड, संताप, दुसऱ्याला कमी लेखण्यातला आनंद, एकावरचा राग दुसऱ्यावर काढणे, ऑफिसमधल्या अपमानाची मुक्ती म्हणून राग कुटुंबीयांवर काढणे.
 (४) द्वेष : दुसऱ्याचा तिरस्कार करणे, त्याला कमी लेखणे, त्यांचे अकल्याण चिंतणे.
 (५) अभिनिवेश : हताशपणा, मानसिक गुलामगिरी.
 यापेक्षा मला स्वतःला 'षड्रिपू' हा शब्द जास्त भावतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, सत्सर यांना षड्रिपू म्हटले जाते. यामुळे क्लेश निर्माण होतातच परंतु त्यातूनच मनाची अवनती होत असते. हा विषय तसा गहन आहे. त्यामुळे आपल्या विषयाशी निगडीत भागाचीच चर्चा केली आहे.
 या सर्वातून मुक्तीचा एकच मार्ग म्हणजे अध्यात्म. मागे आपण ध्यानधारणेची, श्रद्धा, प्रार्थना, जपजाप्य यांची चर्चा केलेली आहेच. वैद्यकशास्त्र हा त्यावरचा उपाय नाही. त्याच्या मर्यादा फारच तोकड्या आहेत. आता एक महत्त्वाचा भाग, जो अध्यात्म व आधुनिक वैद्यक यांच्या पूर्णपणे कक्षेत बसतो व ज्याला वैज्ञानिक आधारही शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला आहे, तो पाहू.

२८१