पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS) :

 या विकाराच्या कक्षेत त्याचे अनेक प्रकार येतात. यात मलविसर्जनक्रिया नैसर्गिकपणे व्हावयास पाहिजे ती न होता तिचे स्वरूपच बदलून ती अनैसर्गिक रूप धारण करते. अनेक व्यक्तींचे बाबत ही गोष्ट आढळून येते. फक्त प्रकार थोडा वेगळा व लक्षणेही वेगळी. महत्त्वाची लक्षणे म्हणजे पोटशूळ, कधी अतिसार व खूप गॅसेस. हा पोटशूळ किंवा वेदना अन्नग्रहणानंतर सुरू होतात. शिवाय अन्नग्रहणानंतर लगेच अतिसार सुरू होतो. याची तीव्रता खूपच कमी - जास्त असू शकते. त्याचा कालखंड व जागाही बदलत असतात. याची मुख्य कारणे आपल्या आवडीनिवडीत व दुसऱ्याने सांगितले म्हणून केले यात आढळतात. आहाराबद्दल अधिकारवाणीने असे सांगितले जाते की कच्चे सलाड, मोडाची धान्ये, काकडी, मुळा अशी फळभाजी खाणे अतिशय हितकारक असते. परंतु हे सत्य का मिथ्या हे ठरवणारे अनेक अस्थिर घटक आहेत. आपली पचनशक्ती, आपले वय, आपल्या लहानपणच्या सवयी अशा अनंत गोष्टी यावर परिणाम करत असतात. काही व्यक्तींना असा कच्चा आहार मानवेल तर काहींना हा पोटशूळाचा विकार सुरू होतो. काही व्यक्तींना दारू, तळणीचे पदार्थ मानवत नाहीत. तळण हे केव्हातरी घरी बदल म्हणून करावयाची गोष्ट. परंतु आज बदल या नावाखाली रोज वडे, मिसळ, भजी यांचा खुराकच घेण्याची फॅशन पडली आहे. काही विद्यार्थी होस्टेलवर, परगावी राहतात. त्यांना हॉटेलचे अन्न घेणे ही अटळ गोष्ट आहे. परंतु तेथेही आरोग्यदायी पदार्थ मिळू शकतात. त्यांनी तळणीचे पदार्थ टाळावेत व ते केव्हातरी घ्यावेत. अशा अनेक केसेस आढळतात. एकच नमुना केस पाहू. अशा अनेक केसेस माझेकडे आलेल्या आहेत, पण ही केस प्रातिनिधिक म्हणून पाहू. एक इंजिनिअरिंगचा अवघा २१-२२ वर्षांचा तरुण. मूळ मुंबईचा परंतु शिक्षणासाठी आजी-आजोबा यांचेकडे राहणारा. खूप श्रीमंत तेव्हा पॉकेटमनीही अगदी भरपूर. याला आपण सोयीसाठी 'विलास' म्हणू या. सकाळी पाव, अंडी असा नाष्टा करून कॉलेजला जावयाचा. तेथे मित्रांबरोबर जेवणाऐवजी अरबट-चरबट पदार्थ खावयाचे. यांत मुख्यतः तळणीचे पदार्थ. हळूहळू त्याला हॉटेलमध्ये खाल्ले की अतिसार व पोटशूळ व्हावयाचा. मग त्यावर डॉक्टरांनी एकवेळ सांगितलेल्या 'लोमोटील' (Lomotil) ह्या गोष्टी घ्यावयाच्या फारच झाले तर डॉक्टरकडे जावयाचे नाहीतर आपली

२९२