पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अत्यंत पूरक आहे. मला स्वतःला होमिओ औषधे व ही पद्धत यामुळे बरेच यश मिळालेले आहे. ही परमेश्वराची कृपा. आता शेवटी मानसिक व्यथेचा एक नमुना पाहू.
घोर, चिंता, चिंतातुरता व धास्ती, घबराट, भयग्रस्तता
(Anxiety & Panic Attacks ) :

 चिंता वाटणे ही तशी नैसर्गिक क्रिया आहे. संकटाच्या चाहुलीने किंवा कल्पनेने सुद्धा जीवाची उलघाल सुरू होते. जोपर्यंत चिंता काबूत आहे, तोपर्यंत भय ही भावना त्रासदायक ठरत नाही. परंतु ज्याप्रमाणे मृत्यूच्या भीतीने मनुष्य आत्यंतिक घबराटीचा बळी होतो, तेव्हा हा झटका अत्यंत हानिकारक असू शकतो. ही घबराट उद्भवण्याची काही महत्त्वाची कारणे ज्ञात आहेत. हा गंड आनुवंशिक किंवा आयुष्यातील निरनिराळ्या अनुभवातून वैयक्तिक स्वरूप म्हणून व वैद्यकीय दृष्ट्या काही औषधे अचानक बंद केल्यास एवढेच काय पण 'कॅफेन' सारख्या साध्या साध्या वस्तूंच्या सतत सेवनाने सुद्धा निर्माण होऊ शकतो. कॅफेन असणारी आधुनिक पेये सातत्याने घेणे, स्ट्राँग कॉफी दिवसभर ढोसणे हे का अपायकारक होते याची कायिक बाजू आहेच, पण ही मानसिक बाजूही महत्त्वाची आहे. हा धास्तीचा तीव्र आघात फक्त अपघातासारख्या घटनांनी किंवा कायिक तीव्र दु:खानेच नव्हे तर दैनंदिन कामातील ताणामुळे सुद्धा निर्माण होतो. सामान्यतः कारण नष्ट झाले की भीती नाहीशी होते. परंतु जी भीती शांत बसून व्यायामाने किंवा अशा गोष्टींनीही जात नाही, जी अकारण असते व सातत्याने राहते ती घबराट. अनेक वेळा तीव्र उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टरॉलची पातळी, आपली संरक्षणक्षमता कमी होणे व काही प्रसंगांतही तीव्र भीती मृत्यूलाही कारणीभूत होऊ शकते, ते कारण खरे असो वा खोटे, मागे त्रिमिती सिनेमा जेव्हा प्रथम आला त्या वेळी विशिष्ट चष्मा घालून तो बघावा लागे. त्यातील व्यक्ती वा प्राणी पडद्यातून बाहेर येऊन तुमच्याकडे येत आहेत अशा भास होत असे. एका सिनेमात एक सिंह आपल्या अंगावर उडी मारून हल्ला करत आहे असा भास होत असे. सुरुवातीस अनेकांनी किंकाळ्यासुद्धा मारल्या होत्या. एक स्त्री हा सीन पाहत असताना जो तीव्र भीतीचा आघात झाला, त्यामुळे क्षणार्धात मृत होऊन खाली पडली. असाच प्रकार अनपेक्षित आनंदामुळे सुद्धा

२९४