पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या अॅड्रेनलिनचा प्रवाह चालू आहे तो बंद करावयाचा. आपला ताण हळूहळू नाहीसा होत आहे अशी कल्पना करावयाची. " ही गोष्ट मला थोडी अवघड वाटते. यापेक्षा शवासन, ॐकार ध्यान किंवा डोळ्यासमोर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती, तिच्या मस्तकाभोवती प्रकाशवलय आहे, त्यातून तो प्रकाश आपलेकडे येत आहे, आपण अंधारातून प्रकाशाकडे जात आहोत अशा प्रकारची धारणा थोडी सोपी वाटते. व्यक्तीव्यक्तीमध्ये थोडे अंतर पडेल. पण ज्याने त्याने आपल्या सोयीनुसार धारणा ठरवावी. या त्रयीने प्रत्येक विकारावर कोणीतरी आपल्याशी संवाद करत आहे असा भास निर्माण करणाऱ्या अनेक टेप्स तयार केल्या आहेत व त्या काही हॉस्पिटलमध्ये रुग्णाला देण्यात येतात. रुग्ण वॉकीटॉकीद्वारा ती टेप ऐकू शकतो व तो आवाज फक्त त्याच्यापुरताच असतो. एका खोलीत बरेच रुग्ण असतील तर प्रत्येक रुग्ण वेगवेगळी टेप ऐकू शकतो. तरीही हॉलमध्ये निःशब्द शांतता नांदू शकते. रुग्णांना संगीत आवडत असेल तर त्याच्याही टेप्स दिल्या जातात. सारांशाने 'इमेजरी' - मानसचित्र पद्धत म्हणजे ध्यानधारणेचेच वेगळे स्वरूप आहे. देह वेगळा, आत्मा एकच. त्यांच्या दाव्याप्रमाणे सर्व लहान मोठ्या रोगांवर ही पद्धत उपयोगी पडते, यांत कॅन्सरसुद्धा आला. डॉ. सायमॉन्टची 'व्हिजुअलायझेशन' पद्धत सुद्धा हेच रूप आहे.
मृत्यू :

 प्रत्येक जीवाच्या जन्म, जीवन व मृत्यू ह्या तीन अवस्था असतात. जन्म ही एक घटना, तिला आपण सुरुवातीची घटना (Starting Activity) असे म्हणू या. तर मृत्यू ही अंतिम घटना (End Event) असे म्हणू या. या घटना काही क्षणात होत नाहीत, त्यांतील अनेक उपघटनांचाही विचार करावा लागतो. जीवन या एकूण घटनेचे कितीतरी उपविभागांत रूपांतर होत असते. प्रत्येक क्षण म्हणजे एक वेगळा कालखंड असतो. जन्मानंतर काही महिन्यांनी मूल रांगू लागणे, उभे राहण्यास शिकणे, चालणे असे होत होत सोळा ते अठरा वयाला तारुण्य येते. हा कालखंडही लवकर संपतो व आयुष्याचा मध्यान्ह कालखंड सुरू होतो व त्यानंतर आयुष्याची सांजवेळ सुरू होते. 'संध्याछाया' भिवविती हृदया, म्हणण्याचा हा कालखंड. पण निसर्गात असे चक्र सर्वच बाबतीत चालू असते. अगदी दिवससुद्धा ह्याच मार्गाने जात असतो. उषःकाल, मध्यान्ह व सायंकाळ ही दिवसाची रूपे तर रात्र ही

२९७