पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनेक वेळा आपण 'क्ष' कुलवृत्तांत पाहतो. त्यांत अनेक नावे आपणास माहीतही नसतात. ज्यांचा जन्मच आपणास माहीत नाही, त्यांचे आपले दृष्टिकोनातून अस्तित्वही असू शकत नाही. हे झाले अंतिम अस्तित्वाच्या संबंधी. पण अनेक गोष्टी नित्य नियमाने आपल्या आयुष्यात घडत असतात. त्या म्हणजेही एक प्रकारचे क्षणैक मृत्यूच. समजा, आपले एखाद्या मित्राशी किंवा अगदी जवळच्या नातेवाइकाशी जबर भांडण झाले व तेव्हापासून आपण त्याचे तोंडही पाहिले नाही तर तो जिवंत असून मृतच असतो. मग मृत्यू आपला किंवा इतरांचा म्हणजे काय असते? या अखंड निरवधिकालाचा तो फक्त क्षण असतो.
 मृत्यूचा जर आपण आध्यात्मिक स्तरावर विचार केला, त्याची भीती नाहीशी करता आली तर जीवन तर सुखी होईलच, परंतु आपली लहान मोठी आजारपणे आपण समजू शकतो, त्यांना खंबीरपणे सामोरे जाऊ शकतो. यामुळे असे आजार अतिशय लवकर बरे होऊ शकतात. अशा प्रसंगांत आपली जी सुप्त शक्ती आहे ती प्रभावीपणे आजाराचा सहज मुकाबला करते. हे कार्य अध्यात्म करत असते, नाहीतर चिंता, धास्ती अशा गोष्टी सहज आपला ताबा घेतात. ही घबराट मृत्यूही आणू शकते. कोठल्याही गोष्टीचा घोर लावून घ्यायचा नाही, त्याचे अस्तित्वच नजरेआड करावयाचे म्हणजे चिंतेला अस्तित्वच उरत नाही.
मृत्यू - काही श्रद्धा व काही व्यवहार :

 आपण जीवनाच्या प्रत्येक अंगासंबंधी विचार करतो. आपले वडील व आई मुलगा/मुलगी अगदी बाल असल्यापासून त्याने पुढे काय व्हावे, त्यासाठी काय शिक्षण घ्यावे लागेल, आपल्या ते किती आवाक्यात आहे वगैरे गोष्टींचा विचार करतात - काही योजना करतात. मुलेही मोठी होत जातात, ती त्यांच्या परीने योजना करत असतात. तारुण्यात लग्नाचा विचार सुरू होतो, त्याचीही योजना केली जाते. आजच्या औद्योगिक क्षेत्रात योजना व कालबद्ध कार्यक्रम यांना अग्रस्थान दिले जाते. सरकारी स्तरावर वार्षिक, पंचवार्षिक अशा योजना आखल्या जातात. पण स्वतःच्या जीवनाची अशी योजना आपण बहुधा आखत नाही. यामुळे पहिला अनुभव येतो तो सेवानिवृत्ती घेतल्यानंतरचा. या निवृत्तीच्या काळाचाही संपूर्ण आराखडा निवृत्तीपूर्वी निदान ४-५ वर्षे तयार पाहिजे. शेवटी मृत्यू, त्याच्याही

२९९