पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इतरांसाठी नसून आपल्याच हिताचे ठरणार आहे. याचा केंद्रबिंदू म्हणजे आपण एका आदिशक्तीचे अंश आहोत. ही आदिशक्ती सर्व ब्रह्मांड व्यापून राहिली आहे. हीच ईश्वर. या श्रद्धेने व 'इदं न मम' म्हणून केलेले काम, आराधना इत्यादी आपले मन उन्नत करत असतात व मग विकार बरे होतात, आपण निरोगी व आनंदी बनू शकतो. या चिंतनातूनच यशप्राप्ती होते. असा हा निरामय जीवनप्राप्तीचा प्रवाह आहे
आरोग्य - देहाचे व आत्म्याचे :

 आध्यात्मिक लोक शारीरिक आरोग्यापेक्षा आत्मिक आरोग्याला श्रेष्ठ मानतात. देह हा नश्वर आहे व त्यामुळे आत्मज्ञान हे श्रेष्ठ. हे जर प्राप्त झाले तर ओघानेच देहाचे आरोग्य सहज प्राप्त होते. याला उदाहरण म्हणून वसिष्ठ, वाल्मीकीसारखे ऋषी, भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य असे पांडवांचे गुरू अशी व्यक्तिमत्त्वे दाखविली जातात. हे खरेही वाटते. कारण अध्यात्म विकार कसे लवकर बरे करू शकते हे आपण पाहिले आहे. असे असेल तर त्यानंतरही अगदी अलीकडील काळात अनेक लोक साधू व संत असूनही त्यांना दीर्घायुष्य व आरोग्य लाभले होतेच असे नाही. म्हणजे दावा व वस्तुस्थिती यांत अंतर पडते. मग “मी आध्यात्मिक झालो यामुळे माझा कॅन्सर कमी झाला वा बरा झाला, हृदयरोगापासून मुक्तता मिळाली” असे जे दावे केले जातात त्यांत सत्य काय व मिथ्या काय? दुसरा मुद्दा असा की जेव्हा आपण फक्त विकारमुक्तीसाठी अध्यात्माची कास धरतो तेव्हा बहुधा अपयशच पदरी पडते. अनेक संशोधकांनी आपल्या अभ्यासाचे असे मिळालेले निष्कर्ष लिहून ठेवलेले आहेत. आपण भारतातील काही उदाहरणे पाहू. डॉ. डीन ऑर्निश, डॉ. चोपरा अशा आधुनिक वैद्यकतज्ज्ञांची पुस्तके वाचून इकडेही अध्यात्माच्या अभ्यासास वेग आला. अनेक अध्यात्ममंदिरे, अनेक स्वामी, गुरू निर्माण झाले. वैद्यकतज्ज्ञही निश्चितकालीन वर्ग घेऊ लागले. परंतु रुग्णावस्थेत बदल झाल्याची काहीही चिन्हे दिसत नाहीत. त्यांत सहभागी होणाऱ्यांचा वेळ व पैसा यांचा मात्र अपव्यय झाला. जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिक आरोग्य किंवा विकारमुक्ती व अध्यात्मवाद यांची सांगड घालून, केवळ त्या मुक्तीसाठी धडपड करत असते, तेव्हा मुळातच त्याची चिंतातुरता अथवा त्या गोष्टीचा घोर नष्ट झालेला नसतो,

३०२