पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बुद्धीचा खेळ असतो. निसर्गात कायदेही त्याचेच - जे कधीही बदलत नाहीत, न्यायमूर्तीही तोच, येथे वकिलीला वाव नाही. घडलेला गुन्हा त्याला क्षणात कळतो. एका विशिष्ट मर्यादिपर्यंत निसर्ग दयाळूपणे न मागताही क्षमा करतो. नंतर मात्र सर्व पापांची बेरीज होऊन जबरदस्त शिक्षा होते. विकार ही ती शिक्षा असते. दारू ही शत्रू आहे, विशिष्ट मर्यादिपर्यंत काहीही होत नाही. मनुष्य तिच्या आहारी जातो व शेवटी 'सिन्हॉसिस' नावाचा लिव्हरचा अत्यंत अवघड विकार होतो, हातापायांना कंप येऊ लागतात. सिगारेट हा दुसरा मोठा शत्रू . सुरुवातीस बरे वाटते परंतु त्याची मर्यादा ओलांडली की कॅन्सर, हृदयविकार असे दुर्धर रोग होतात. अगदी सौम्य शिक्षा म्हणजे 'एपिसेमा ' हा फुफ्फुसांचा रोग. यात शेवटी अतिशय हाल होतात. म्हणजे निसर्ग या पापांच्या फळासाठी जबर शिक्षा करतो. याला महत्त्वाचे कारण मनाची अवनती असते. आपण जर निसर्गनियमांचे पालन केले, दिनचर्या व्यवस्थित ठेवली, सुयोग्य सात्त्विक आहार घेतला, व्यायाम व योगसाधना याची कास धरली तर विकार खूप दूर राहतील. जे विकार येतील ते आपली स्वसंरक्षण करण्याची कुवत कमी असल्यामुळे. याचबरोबर आपले मन जर उन्नत असेल तर विकारांचा जोरही कमी असतो व त्यातून मुक्तीही लवकर मिळते. औषधोपचारसुद्धा अतिरिक्त झाले तर त्यालाही जबर शिक्षा आहे. येथे एक गोष्ट मनावर ठसवली पाहिजे की विश्वात सर्वांगी परिपूर्ण असे काहीच नाही. पण त्यांचे एकमेकांशी बंधुत्वाचे नाते असते. त्यांचा समुच्चयी परिणाम अमृतासमान असतो. यामुळेच हे सहज ध्यानात यावे की वैद्यकशास्त्रही निसर्गनियमावर आधारित आहे, वैज्ञानिक आहे, परंतु निश्चित परिपूर्ण नाही. हीच गोष्ट आध्यात्मिक मार्गाची. या दोन्ही मार्गांचे एक दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ असे सर्वस्वाने समर्थन करणे हाही हेकटपणा ठरतो. दोन्ही गोष्टी एकमेकांना अत्यंत पूरक आहेत हे मान्य केले पाहिजे. आपल्या पूर्वजांनी हे मान्य केले होते. नाहीतर आयुर्वेद निर्माणच झाला नसता. उपनिषदे, वेद, योगसूत्रे, गीता ही आयुर्वेदाला पूरकच आहेत.

 वस्तुस्थिती अशी आहे की जगात अनेक वैद्यकपद्धती प्रचलित आहेत. यांतील कोणती चांगली व कोणती वाईट हे कसे ठरवावयाचे? वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येक पद्धतीमध्ये काही गुण व काही उणिवा आहेतच. तेव्हा आधुनिक वैद्यकाखेरीज इतर कोणत्याही पद्धतीची औषधे नकोत म्हणणे अयोग्य होईल. यात निकष हा

३०४