पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लावावयाचा की शरीराला अपायकारक अशी द्रव्ये शक्यतो नकोत. औषधांमुळे तीव्र दुष्परिणाम घडत असतील, तर ती औषधे नकोत. आता सर्पविषाचेच पाहाना. सर्पविष म्हणजे मृत्यूला निमंत्रण. पण तेच विष संस्कार केले तर विकारमुक्तीसाठी उपयुक्त ठरते. होमिओपॅथीत अनेक औषधे सर्पविषापासून तयार केलेली आहेत. आपण दोन औषधे नमुन्यादाखल पाहू. पहिले आहे बोथ्रोप्स. व्हायपर जातीच्या सापाच्या विषापासून तयार केलेले औषध. ह्या विषामुळे रक्ताच्या गोठण्याची क्रिया होते. परंतु तेच विष सूक्ष्मीकरण करून होमिओ पद्धतीने दिले तर रक्तात झालेल्या गुठळ्या विरघळवण्यास मदत होते. असेच दुसरे औषध म्हणजे लॅकेसिस, या विषामुळे रक्तस्राव सुरू होतात. पण हेच होमिओ औषध रक्तस्राव होत असेल तर तो थांबवण्यास उपयोगी पडते. हाच नियम आधुनिक औषधांचे बाबत लावता येणे शक्य आहे. मी स्वतः असा एक माझेवरच प्रयोग केला आहे. तापावर क्रोसीन हे औषध दिले जाते. या एका गोळीस ९पट दुग्धशर्करा घालून ती पाचशे वेळा खलली म्हणजे ते १ शक्तीचे औषध तयार होते. यातील शेंगदाण्याएवढी पावडर पूर्ण क्रोसीनच्या गोळी एवढे काम करू शकते. याचा अर्थ एवढाच की औषध घेतले की त्याचे दुष्परिणाम होणारच हा दावा फोल ठरतो. नैसर्गिक वस्तूवर योग्य प्रक्रिया केल्यास त्रास न होता गुण येतो. तेव्हा प्रत्येक वैद्यक पद्धतीतील गुण एकत्र केले तर दुष्परिणाम न होता गुणाची अपेक्षा करता येईल
 याचे सार एवढेच की सर्व पद्धती उपयुक्त आहेत, ही तत्त्वप्रणाली आता मान्यताप्राप्त असून त्याला नाव दिले गेले आहे समन्वयी (Holistic) पद्धत,अर्थात भारतात, निदान महाराष्ट्रात तरी त्याचा वापर व्यवहारात जवळजवळ नाहीच. परंतु तिला मान्यता मात्र आहे. तसे अध्यात्माचे बाबत मात्र दिसत नाही. अध्यात्मवादी आधुनिकता फारशी पसंत करत नाहीत, तर वैद्यकशास्त्रात अध्यात्माला काहीही स्थान नाही. आपण नमुना म्हणून कोठली ही दोन-तीन हॉस्पिटल्स पाहिली तर तेथील सेवा एकांगी अलिप्ततेची व यांत्रिक असते व रुग्णाला दिलासा देणारी आहे असे दिसत नाही. अमेरिकेतील प्रयोग, निष्कर्ष व अनुभव यामुळे तेथे मात्र ही उत्तम मूळ धरत आहे. खरे म्हणजे यात अवघड काहीच नाही. अध्यात्म व वैद्यक ही एकमेकांस अत्यंत पूरक आहेत. यातून कल्पनातीत यश मिळते असे मी अनुभवावरून सांगू शकतो. अर्थात हा काही माझा व्यवसाय नाही,

३०५