पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यामुळे मला हे मोठ्या प्रमाणावर करता आलेले नाही.
 मृत्यू दिसू लागला की मनुष्य नुसताच आध्यात्मिक होत नाही तर त्याच्या जीवनाच्या कल्पनाच बदलून जातात. • तुटलेले नातेसंबंध जोडणारा असा हा सेतू आहे. या जीवनात अपुऱ्या राहिलेल्या कार्यापैकी काही प्रेम करणारी माणसे, त्या इच्छा पूर्ण करतील असा विश्वास येतो. या समयी कोणकोणत्या आठवणी येत असतील किंवा येतात यांची नोंद झाली आहे. अर्थात याचा आधार मृत्यूला भेटून परत आलेल्या माणसाकडून सांगितले गेलेले अनुभव असणार, पण प्रत्यक्ष मृत्यू न येताही तो डोळ्यासमोर दिसू लागला तर मानवाच्या भावना काय असतात यासंबंधी तज्ज्ञांनी लिहून ठेवलेल्या हकीकती आहेत. यांचे ज्ञान त्या व्यक्तीला शांती देण्यात होऊ शकते. (१) आपण पूर्वी केलेले अपराध, वाईट वागणूक वगैरे परत डोळ्यांसमोर येत असतात. (२) आपण आपल्या कुटुंबातील अत्यंत जवळच्या घटकावर केलेल्या अन्यायाचा पश्चात्ताप होतो. अशा वेळी त्या व्यक्तीला आधार देणे, मायेने वागणे, सेवा करणे, सस्मित मुखाने त्याची सेवा करणे व त्याची खात्री झाली पाहिजे की आपल्यावर निरपेक्ष माया करणारे लोक आहेत. आपण त्यांचे अपराध करूनही त्यांनी ते पोटात घालून माझी सेवा करत आहेत. ही भावना माणसाला मृत्यूच्या दारातूनही परत आणू शकते. यातून श्रद्धा निर्माण होते, भीती नाहीशी होते आणि मृत्यू यावयाचा असेल तर शांत मनाने येतो. त्याला तो शांत मनाने यावा हे त्याची सेवा करणाऱ्या लोकांच्या हातात असते. मृत्यू कसा यावा याबद्दल आपल्या पूर्वजांनी मृत्युंजय जप सांगितला आहे
. ॐ त्र्यंबकं यजामहे । सुगंधीम् पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बंधनात् । मृत्योर्मुक्षीय माममृतात् ॥

 एखादे पिकलेले फळ (काकडी असा येथे शब्द आहे) ज्याप्रमाणे वेलीपासून गळून पडते तसा मला मृत्यू येवो.

३०६